कर्जत तहसीलमध्ये भजनी आंदोलन व वारीच्या माध्यमातून निवेदन सादर
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
रायगड जिल्ह्यातील कर्जत वारकरी संप्रदाय व विश्व हिंदू परीषदेच्या माध्यमातून पायी वारीला विरोध, वारकर्यांवर अत्याचार, भागवत धर्माच्या पताकाचा अपमान व जेष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना केलेल्या नजर कैदेचा निषेध म्हणून कर्जत तहसील कार्यालयाच्या प्रांगणात भजनी आंदोलन व वारी काढत माऊलींचा जयघोष करत प्रशासनाच्या कृत्याचा जाहिर निषेध करण्यात आला.
नायब तहसिलदार सुधाकर राठोड यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले, याप्रसंगी रायगड भुषण ह.भ.प. मारुती महाराज राणे, ह.भ.प. नामदेव महाराज जाधव, ह.भ.प. निवृत्ती महाराज शिंदे, बजरंग दल कुलाबा संयोजक साईनाथ श्रीखंडे, विश्व हिंदू परिषद तालुका प्रखंड विशाल जोशी यांसह सर्वश्री ह. भ. प. प्रभाकर बडेकर, चंद्रकांत कडू, अनंत हजारे, महेश बडेकर, शंकर म्हसे, दत्ता म्हसे, कृष्णा पालकर, अर्जून देशमुख, दौलत देशमुख, वासुदेव बडेकर, संदिप सुर्वे, दत्ता कदम, संजीव दातार, महेश निघोजकर, वकिल गायत्री परांजपे यांसह अन्य सहकारी उपस्थित होते.
राज्य सरकारचा वारी विरोध म्हणजे सरकारने आस्मानी संकटांचा फायदा घेत पोलीस प्रशासाच्या बळाने वारकऱ्यांवर जाणीवपूर्वक केलेले सुलतानी अत्याचार, तसेच महाराष्ट्राचे जेष्ठ कीर्तनकार आदरणीय ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना केलेली अटक त्यानंतर फसवून त्यांची केलेली नजर कैद हा त्याचाच एक प्रकार आहे. भर रस्त्यात वारकर्यांचे पारंपारिक गणवेश उतरवायला लावणे, हिंदुत्वाचे व महाराष्ट्राच्या संकृतीचे प्रतिक असलेल्या भागवत धर्मीय पताकाची अवहेलना करण, आदरणीय हरी भक्त पारायण निरपराध संताना अटक करणे त्यांना अपराध्याची वागणूक देणे, जागोजागी वारकर्यांची अडवणूक करणे त्यांच्या वर प्रशासनिक बडगा दाखवून अत्याचार करणे हे अत्यंत निषेधार्य आहे.
संविधानाने नागरिकांना उपासना करण्याचा अधिकार व स्वातंत्र बहाल केलेले आहे त्याना कोणीही धक्का लावू शकत नाही. त्याच अनुषंगाने विश्व हिन्दू परिषद व समस्त वारकरी संप्रदायाद्वारे कर्जत तहसील कार्यालयात भजनी आंदोलन रामकृष्ण हरीचा जयघोषात करण्यात आले.
Be First to Comment