Press "Enter" to skip to content

विद्यार्थ्यांना दाखले घरपोच देण्याची उरण पत्रकार संघाची मागणी


सिटी बेल लाइव्ह / उरण (वैशाली कडू)

बारावीचा निकाल लागला आहे. तर काही दिवसांत दहावीचा म्हणजे शाळांत परीक्षेचा निकाल लागणार आहे. या निकाला नंतर पुढील प्रवेशासाठी विविध दाखले लागणार आहेत. सदर दाखले हे तहसील कार्यालयातुन मिळणार असल्याने संबंधित कार्यालयात विध्यार्थी व पालकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या महामारीत प्रशासनाने याची दखल घेऊन विद्यार्थ्यांना हे दाखले घरपोच मिळण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे केली आहे.
निकाल लागल्यानंतर अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला तसेच इतर प्रमाणपत्रांची गरज भासते. अशा वेळी त्यांचे अर्ज ई- सेवा केंद्रांमध्ये करून हे दाखले दिले जात असत. दाखल्यांसाठी अर्ज भरण्याकामी तसेच ते मिळवण्यासाठी विद्यार्थी व पालकांना अनेकदा हेलपाटे मारावे लागत असल्याने तसेच केंद्राच्या बाहेर गर्दी होत असते. करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर हे धोकादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
करोना संक्रमणाचा प्रादुर्भाव जाणवणाऱ्या ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्रे घोषित करणे तसेच सामुदायिक प्रसार होणे टाळण्यासाठी एखाद्या गावांमध्ये मर्यादित काळासाठी कठोर टाळेबंदी लावण्याचे निर्णय आरोग्य विभागाकडून प्राप्त माहितीवरून घेतले जातात. एखाद्या परिसरात वाढणारी रुग्णसंख्या हीच टाळेबंदी लादण्याचा निकष आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पहाता त्याला आळा घालण्यासाठी निकाला नंतर जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात होणारी विद्यार्थी व पालकांची गर्दी होणार आहे. हे टाळण्यासाठी त्यांना पुढील शिक्षणासाठी लागणारे दाखले घरपोच देण्याची व्यवस्था केली तर कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात रोखता येईल. तरी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आमच्या मागणीचा विचार करून विद्यार्थी व पालक वर्गाला न्याय द्यावा अशी मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.