दुचाकीस्वारांसह पादचाऱ्यांना होतोय त्रास
सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) :

जुलै महिना संपत आला तरी यावर्षी अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. मध्यतरी पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर समाधानकारक पाऊस पडला होता. मात्र काही दिवसांपासुन पावसाने विश्रांती घेतल्यामुळे मुंबई -गोवा महामार्गावर नागोठणे ते कोलाड या दरम्यान मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे दुचाकीस्वार व पायी चालत जाणा-यांना मोठ्या प्रमाणात या धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे.
पावसाळ्यात खड्डयांनी धोकादायक बनलेल्या मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नागोठणे ते कोलाड रस्ता नव्या समस्यांनी चर्चेत आहे. मोठ-मोठे खड्डे व डांबर पुर्णपणे उखडल्याने सध्या महामार्गावर धुळीचे लोट निर्माण होत आहेत. त्यामुळे अपघातांना अजुन भर पडणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर्षीच्या पहिल्या पावसातच महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डयांचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे या पडलेल्या खड्ड्यांमध्ये संबधित ठेकेदाराकडुन प्राथमिक स्वरुपाची उपाययोजना म्हणुन निकृष्ट दर्जाची मोठमोठी खडी व माती वापरुन खड्डे भरण्यात आले होते. त्यातच गेले पाच ते सहा दिवसांपासुन पावसाने विश्रांती घेतल्यामुळे महामार्गावर नागोठणे ते कोलाड दरम्यानच्या रस्त्यावर धुळीचे लोट दिसत आहेत. त्यामुळे समोरील वाहने व उलट दिशेने येणा-या वाहनांचा अंदाज येणे कठीण बनले आहे. दुचाकी चालकांची यामुळे प्रचंड अडचण होत आहे. बुजविण्यात आलेल्या खड्डयांमधील खडी व माती रस्त्यावरच पसरल्यामुळे जोरात येणा-या – जाणा-या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात धुळ उडत असल्याने दुचाकीस्वार व पादचारी यांच्या डोळ्यात धुळ जावून त्यांना याचा नाहक त्रास सोसावा लागत आहे.
तसेच रस्त्यावर पडलेली खडी रस्त्यावरील पादचाऱ्यांना लागण्याची भिती निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे रस्त्यावरुन अतिवेगाने जाणा-या वाहनांमुळे धुळ उडत असल्यामुळे दुचाकीस्वारांना व पायी चालत जाणा-यांना धुळीमुळे समोरचे काहीच दिसत नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच ही धुळ नाकावाटे व तोंडाद्वारे शरिरामध्ये जाऊन दमा, खोकला तसेच डोळ्यांमध्ये गेल्यामुळे विविंध आजारांना सामोरे जावेच लागत आहे. दरम्यान यासंबधित ठेकेदारांकडुन या मार्गावरील रस्त्याच्या कामांमध्ये अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे याहीपुर्वी स्पष्ट झाले आहे. त्यामुळे वाहनचालकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.






Be First to Comment