सिटी बेल लाइव्ह / आरोग्य कट्टा (घन:श्याम कडू)
देशात व राज्यात कोरोना कोविड १९ विषाणूंनीने हाहाःकार माजवला आहे. या आजाराची दहशत एवढी झाली आहे, की एखाद्या पेशंटला सर्दी खोकला झाला तरी त्याला कोरोना झाल्याच्या भीतीने ते डॉक्टरकडे जाणे टाळतात. परंतु पावसाळा सुरू झाला की व्हायरल तापाबरोबर सर्दी खोकला व इतर आजाराला सुरुवात होते. त्यामुळे आपल्याला कोरोना झाला आहे ही भीती प्रथमता मनातून काढून टाकावी.
राहिला प्रश्न कोरोनाचा या आजाराला घाबरण्यासारखा नाही. त्याचा बाऊ केल्यामुळे जनतेच्या मनात या आजाराची भीती मोठ्या प्रमाणात झाली आहे. कोरोना होऊ नये यासाठी व झाल्यानंतर योग्य ती खबरदारी घेतली तर नक्कीच १० ते १२ दिवसांत बरा होता असे मत काही डॉक्टर मंडळीने आमच्याशी बोलताना व्यक्त केले.
दरवर्षी पावसाळा सुरुवात झाली की सर्दी खोकल्या बरोबर व्हायरल ताप व डेंग्यू, मलेरिया या आजारांचा प्रामुख्याने प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होताना आपणास दिसतो. त्यात कोरोना सारख्या विषाणूचा जन्म ४-५ महिन्यांपूर्वी झाला. त्यात या आजारावर कोणते उपाय नसून कोणाला झाल्यास त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागत असल्याचा समज निर्माण झाला आहे. त्यामुळेच जनतेच्या मनात कोरोना विषाणूची भीती जास्त वाटत आहे. परंतु त्यावर जी काही खबरदारी घ्यावयाची आहे, ती घेतली तर कोरोना आजारातून माणूस पूर्णपणे बरा होऊ शकतो.
त्यासाठी प्रामुख्याने भरपूर विश्रांती घेणे, डॉक्टरांच्या सल्ल्याने सर्दी, खोकला, घसादुखी आणि तापावर औषधे घ्या, मजबूत प्रतिकार प्रणालीसाठी पोषक आणि आरोग्यपूर्ण आहार घ्या, वैयक्तिक स्वच्छता, वाफारा घेणे, साबणाने हात स्वच्छ धुवा, अल्कोहोल असलेल्या सॅनिटायझरने हात स्वच्छ धुवा, तुमच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा, शिंकताना आणि खोकताना तुमचे नाक आणि तोंड झाका, एकदा वापरलेल्या टिश्यूची नीट विल्हेवाट लावा, तुमच्या नाकाला आणि डोळ्यांना स्पर्श करू नका, वापरलेल्या वस्तू वारंवार निर्जंतुक करा, ज्यांना सर्दी, खोकला झालेला आहे लोकांशी संपर्क टाळा, प्राण्यांशी संपर्क टाळा, कच्चे मांस खाणे टाळा, आणि दूध नीट तापवल्याशिवाय पिऊ नका, कच्चे मांस हाताळताना ग्लोव्हज घाला आणि पुन्हा संसर्ग होऊ नये म्हणून वेगळे ठेवा, तसेच जर आपल्याला कोणत्याही वस्तूंची गरज असेल पण सध्या आहे त्यातच जमवून घावे अन्यथा कोणीतरी एकानेच बाहेर जावे अशी खबरदारी घेत त्याचे पालन केले तर नक्कीच कोरोना आपल्यापासून पळून जाईल असा विश्वास वाटतो.
कोरोना आजाराची प्रामुख्याने लक्षणे ताप किंवा थंडी वाजणे, थरथरणे, स्नायूंमध्ये दुखणे, डोकेदुखी, खोकला किंवा घसा खवखवणे, चव न कळणे किंवा वास न येणे, थकवा येणे, श्वास घेण्यास अडथळा, श्वास घेण्यास त्रास होणे हे करोना विषाणूच्या संसर्गाचे एक प्रमुख लक्षण आहे. डोकं दुखणं हेही करोना व्हायरसच्या लक्षणांपैकी एक आहे. अंगदुखी, सर्दी-ताप येऊन अंग दुखणं, हेही करोनाच्या लक्षणांपैकी एक आहे. करोना व्हायरसची लागण झाल्यास न्यूमोनिया तसेच किडनी फेल्युअरसारखे परिणामही होण्याचा धोका असतो. त्यामुळे वरील लक्षणे सतत राहिल्यास डॉक्टरकडे जाऊन नियमित तपासणी करून घेणे आवश्यक आहे.
कोरोना झालेल्या पेशंटने घाबरून न जाता हिमतीने या आजाराचा सामना केला तर नक्कीच पेशंट बरा होऊन सुखरुपणे घरी येऊ शकतो. त्यासाठी यावर असलेल्या उपाययोजनेचा काटेकोरपणे पालन करून वेळच्या वेळी औषधे घेतली तर काही दिवसांतच पेशंट ठणठणीत बरा होत असतो. म्हणून या आजाराला न घाबरता धैर्याने सामना केला तर या आजाराची तीव्रता जाणवत नाही. तरी सर्वांनी कोरोनाची भीती न बाळगता यशस्वीपणे योग्य ती खबरदारी व उपाययोजना केली तर नक्कीच कोरोनाची सुरू असलेली दहशत काही दिवसांतच संपुष्टात येईल असा विश्वास काही डॉक्टर मंडळीने व्यक्त केला आहे.






Be First to Comment