Press "Enter" to skip to content

रा.स्व.संघ जनकल्याण समितीने दिला वादळग्रस्त आदिवासी भगिनीला आधार

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

16 आणि 17 मे रोजी आलेल्या तोक्ते चक्रीवादळामुळे कर्जत तालुक्यातील पेठ गावातील आदिवासी भगिनी नंदा डामसे यांच्या घरावरील पत्रे पूर्णतः उडून गेले होते. घराचे तसेच आतील सामानाचे प्रचंड नुकसान झाले होते. रा.स्व.संघ जनकल्याण समितीच्या कार्यकर्त्यांना याबाबत माहिती मिळाल्यावर जनकल्याण समितीने नंदा डामसे यांना घराच्या पुनर्बांधणीसाठी तातडीने मदत केल्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वीच त्यांच्या घरावर छप्पर बसले आहे. त्यामुळे वादळग्रस्त डामसे कुटुंबीयांना मोठा आधार मिळाला आहे.

रा.स्व.संघ जनकल्याण समितीच्या वतीने वनवासी पाड्यांवर आरोग्य रक्षक योजना राबवली जाते. पेठ या गावी नंदा डामसे या आरोग्यरक्षिका म्हणून काम पाहतात. तौक्ते चक्रीवादळात त्यांच्या घराची दुर्दशा झाल्यामुळे त्या हवालदिल झाल्या होत्या. शासकीय मदतही त्यांच्यापर्यंत पोहोचली नव्हती. जनकल्याण समितीचे अंशकालीन कार्यकर्ते भगवान भगत यांचा पेठ परिसरामध्ये प्रवास असताना त्यांना डामसे यांच्या घराच्या नुकसानीची माहिती मिळाली. डामसे यांनीही जनकल्याण समितीकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली. त्यानंतर भगत यांनी लगेच जनकल्याण समितीचे जिल्हा कार्यवाह नितीन भावे यांच्याशी संपर्क साधला. पावसाळा तोंडावर असल्यामुळे तातडीने हालचाली होणे आवश्यक होते. म्हणून नितीन भावे यांनी जिल्हा अध्यक्ष अरुण दाते, विभाग कार्यवाह रविकिरण काळे, कोकण संभाग कार्यवाह अविनाश धाट,सहकार्यवाह सुहास जोशी आणि महाराष्ट्र प्रांताचे कोषाध्यक्ष प्रदीप पराडकर यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून त्यांना परिस्थितीची जाणीव करून दिले.

प्रांताकडे योग्य तो अहवाल पाठवल्यानंतर, प्रांत कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये नंदा डामसे यांच्या घराच्या पुनर्बांधणीसाठी सर्वतोपरी मदत करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. तशा सूचना ही त्यांनी जिल्हा कार्यवाहांना केल्या. त्यानंतर लगेचच घरासाठी लागणारे पत्रे ,लोखंडी पाईप ,सिमेंट यांची खरेदी करून डामसे यांच्या घरावर छप्पर बसवण्यात आले. अशा प्रकारे जनकल्याण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने मदत केल्याबद्दल नंदा डामसे यांनी जनकल्याण समितीचे आभार व्यक्त केले आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.