व्यापारी वर्गाने एकजूट ठेवल्यास कोणत्याही संकटाला आपण सामोरे जाऊ शकतो : महेंद्र थोरवे
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
‘कोरोनाच्या संकटात व्यापारी वर्गाने संयम दाखविल्याने आपण या संकटातून बाहेर येत आहोत. सध्या ग्लोबल राजकारण सुरू आहे त्यामुळे व्यापारी वर्गाने एकजूट ठेवणे आवश्यक आहे. आपण एकजूट ठेवल्यास कोणत्याही संकटाला आपण सामोरे जाऊ शकतो. माझ्याबद्दल अनेक गैरसमज पसरविले गेले आहेत. मात्र तसे काही नाही माझ्या संपर्कात आल्यावर मी कसा आहे? ते तुम्हाला समजेल. कोणत्याही परिस्थितीत मी तुमच्या बरोबर आहे. कारण मी सुद्धा एक व्यापारी आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या काय अडचणी आहेत. त्या मला माहित आहेत.’ असे महत्वपूर्ण प्रतिपादन आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधताना येथे केले.
कर्जतच्या व्यापारी वर्गाच्या समस्या समजून घेण्यासाठी श्री शनी मंदिराच्या रवी किरण सभागृहात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सराफ असोसिएशनचे मोहन ओसवाल यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर कर्जत व्यापारी फेडरेशनचे उपाध्यक्ष रणजित जैन, किराणा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मदन परमार, सराफ असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष मोहन ओसवाल, कर्जत सराफ असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण भलगट, भाजप जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, नगरसेवक बळवंत घुमरे, घेवरचंद ओसवाल, लालजी राजपुरोहित, पंकज पाटील आदी उपस्थित होते.
आमदार थोरवे आपल्या मनोगतात पुढे म्हणाले, ‘राज्यसरकारने दिलेले आदेश पाळणे गरजेचे आहे. मात्र त्याचा अतिरेक होत असेल तर याबाबत जिल्हाधिकारी व पोलीस यंत्रणेशी चर्चा करून त्यातून मार्ग काढण्यात येईल. गेल्या सव्वा वर्षापासून कोरोनाशी लढा देताना आपले सर्वांचे सहकार्य लाभत आहे. तरीही आपल्या जवळच्या माणसांना आपण वाचवू शकलो नाहीत. खरे तर जीवनावश्यक पेक्षा आपले जीवन वाचविणे महत्वाचे आहे. आपले सर्व व्यवहार बंद आणि डी मार्ट सुरू हे बरोबर नाही. यापुढे आपल्या बरोबरच डी मार्ट पण बंद करण्यात येईल.’ असा शब्द दिला.
प्रास्ताविकात बळवंत घुमरे यांनी, ‘कर्जत बाजारपेठेतील व्यापारी वर्ग प्रत्येक लॉक डाऊनच्या वेळी संभ्रमात असतो. त्याला योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने तो गोंधळला जातो व त्यामुळे त्याचे नुकसान होते. आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून ही बैठक आयोजित केली असल्याचे सांगितले. मोहन ओसवाल यांनी, ‘आपल्या व्यापारी वर्गाच्या मागे आमदार असल्यास आपल्या अडचणी सुटू शकतात. त्यांच्या कडून योग्य मार्गदर्शन मिळू शकेल.’ असे स्पष्ट केले. रणजित जैन यांनी आपल्या मनोगतात, ‘डी मार्ट मुळे तालुक्यातील शेकडो व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यातच दोन दिवस सर्व बंद असताना डी मार्ट मात्र सुरू होते. त्यामुळे आमच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे झाले आहे.’ असे सांगितले. दीपक बेहरे यांनी, ‘कर्जत मध्ये कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत आहे. मात्र आजारी असणारेच आपली चाचणी करून घेत असल्याने पॉझिटिव्ह चा रेट वाढत आहे. तालुक्यातील परिस्थितीची जिल्हाधिकाऱ्यांना कल्पना देऊन काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा.’ असे सूचित केले. सुमेश शेट्ये, साजन ओसवाल, भैलू पटेल, सुरेश ओसवाल, प्रकाश ओसवाल यांनीही आपल्या अडचणी मांडताना ‘पोलीस यंत्रणेला आवरावे.’ असे सूचित केले.
याप्रसंगी नगरसेवक संकेत भासे, साजन ओसवाल, मंगल ओसवाल, हिम्मत ओसवाल, अरविंद जैन, योगेश ओसवाल, सुरेश बोराडे, मनोहर कडू आदी उपस्थित होते.








Be First to Comment