सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |
रिमझिम स्वरुपात पडत असलेल्या पावसाच्या पाण्याचा फायदा घेत बळीराजाने चालू हंगामातील आपल्या खरीपाच्या हंगामातील पेरणीच्या कामाला सुरुवात केली आहे.
सध्या सा-या जगभरात कोरोना या महाभयानक महामारीने थैमान घातले असून सारे व्यवहार ठप्पच झाले आहेत. तर त्यामध्ये भरीस भर म्हणून मध्यंतरी येऊन गेलेल्या वादळाने ऊन्हाळी भात पिकांचेही मोठे नुकसान केल्याने शेती क्षेत्रावर देखील संकटाची कु-हाड कोसळली असतानाच शेतकरी वर्गही आर्थिक विवंचनेत सापडला आहे. असे जरी असले तरी वर्षभराच्या रोजीरोटीची तरतूद व्हावी यासाठी काढओढ काढून भात पेरणीची तयारी केली असल्याचे शेतकरी वर्गाने माहिती देताना सांगितले आहे.
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने ब-यापैकी सुरुवात केल्याने या वर्षीच्या खरीप हंगामात बळीराजा सुखावला असून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पेरणीलायक पडत असलेला पाऊस व भात पेरणीस पोषक परिस्थिती असल्याने बळीराजाने ठिकठिकाणी आपल्या पेरणीच्या कामास प्रारंभ केला असल्याचे द्रुष्य पहावयास मिळत आहे.
मागील पंधरा दिवसापूर्वी करण्यात आलेल्या धुळ वाफेच्या पेरणीतून काही ठिकाणी भाताचे मोड वर येऊन हिरवळ पसरली असल्याने काही शेतकरी बांधवांनी सध्याच्या रिमझिम बरसणा-या पावसाच्या पाण्याचा फायदा घेऊन खताची एक मात्राही दिली आहे.तर आता सुरुवात केलेला पाऊस कायमच असाच बरसत राहिला तर लवकरच भाताचे राबही लागवडी लायक होतील व लागवडीची कामेही योग्य कालावधीत पुर्ण होतील असा अंदाज जाणकार शेतकरी वर्गानी वर्तविला आहे.








Be First to Comment