सिटी बेल |कर्जत | संजय गायकवाड |
काल पासून सुरू झालेल्या नवीन नियमावलीची व्यापारी वर्गाला काहीच कल्पना नसल्याने दुकाने कधी उघडी ठेवावीत व कधी बंद करावीत याबाबत संभ्रम निर्माण झाल्याने अनेकांचे नुकसान झाले. तर आज कर्जत व्यापारी फेडरेशनच्या वाटसप ग्रुपवर सर्व दुकाने सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत उघडी ठेवावीत असा मॅसेज आल्याने आनंदित होऊन कर्जत बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी सकाळी सर्व दुकाने उघडली मात्र अकराच्या सुमारास पोलिसांनी कारवाई सुरू केली. त्यामुळे व्यापाऱ्यांना पोलीस ठाणे गाठावे लागले. पोलीस निरीक्षकांनी आदेश समजावून सांगितल्यावर या गोंधळावर पडदा पडला.
मंगळवार पासून लॉक डाऊनची नवीन नियमावली आली त्यामध्ये सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंतच्या ऐवजी सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंतच जीवनावश्यक सेवेची दुकाने उघडी ठेवावीत. असे आदेश जिल्हाधिकाऱ्यां कडून पारित झाले परंतु ते स्पष्टपणे सोशल मीडिया किंवा कोणत्याही शासकिय सूचना न मिळाल्याने व्यापारी वर्गाने दुकाने उघडली परंतु दोन वाजता दुकाने बंद करण्यासाठी पोलीस कर्मचारी आल्याने व्यापारी वर्गाची धावपळ झाली.
काल सायंकाळी साडे पाचच्या सुमारास कर्जत व्यापारी फेडरेशनच्या वाटसप ग्रुपवर ‘खुश खबर उद्यापासून सर्व दुकाने सकाळी सात ते दुपारी दोन या दरम्यान सुरू राहतील…..’ असा मेसेज आला. महिना – दीड महिन्यापासून बंद असलेली ज्वेलर्स, कपड्याची, भांड्यांची, जनरल स्टोअर्स, इलेक्ट्रॉनिक्सची दुकाने उघडण्यात येणार असल्याने व्यापारी वर्ग खुश झाला.
सकाळी व्यापारी वर्गाने आप – आपली दुकाने सुरू करून व्यवसाय सुरूही केला. मात्र अकरा वाजता सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू आल्हाट आणि पोलीस कर्मचारी रुपेश म्हात्रे यांनी दुकाने बंद करण्यास सांगितले. त्यामुळे व्यापारी वर्गात गोंधळ उडाला. यावेळी मोठ्या संख्येने व्यापारी जमा झाले. काही वेळ व्यापारी व पोलिसांमध्ये वाद – विवाद झाला. पोलिसांनी नऊ व्यापाऱ्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले.
त्यांनतर रायगड जिल्हा शांतता समिती सदस्य रणजित जैन, सराफ असोसिएशनचे मोहन ओसवाल, कर्जत किराणा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मदन परमार, कर्जत सराफ असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण भलगट, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राजेश ओसवाल, साजन ओसवाल, लालजी राजपुरोहित, नगरसेवक बळवंत घुमरे, गणेश जोशी आदिंनी व्यापाऱ्यांसह पोलीस निरीक्षक अरुण भोर यांची भेट घेतली.
पोलीस निरीक्षक भोर यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी पारित केलेल्या आदेशाच्या प्रति दाखवून पनवेल व उर्वरित जिल्ह्यासाठी असलेले नियम दाखविले. त्यानंतर रणजित जैन यांनी ‘जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाची उकल न झाल्याने पोलीस अधिक्षक आणि उप आयुक्त कार्यक्षेत्रामुळे गोंधळ उडाला. त्यामुळे दुकाने उघडी ठेवावीत मेसेज आला आणि दुकाने उघडण्यात आली. गैरसमजामुळे हा प्रकार झाला. त्यामुळे आपण ताब्यात घेतलेल्या नऊ व्यापाऱ्यांवर कारवाई करू नये.’ अशी विनंती केली. मोहन ओसवाल यांनी ‘पोलिसांचे नेहमीच सहकार्य असते. व्यापारी वर्ग सुद्धा पोलिसांचा नेहमीच आदर करते. हा प्रकार आदेशाची योग्य उकल न झाल्याने घडला आहे. एक वेळ व्यापारी वर्गाला संधी द्यावी. आम्ही सर्व नियमाप्रमाणेच व्यवसाय करू.’ असे सांगितले. अरुण भोर यांनी व्यापारी प्रतिनिधींची विनंती मान्य करून ‘त्या’ व्यापाऱ्यांना सोडून दिले व झालेल्या गोंधळावर पडदा पडला.








Be First to Comment