सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड ।
कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागात सातत्याने वणवे लागत आहेत.या आगी लागतात की जाणूनबुजून लावल्या जातात याचा शोध घेणे गरजेचे आहे.वणवे लावण्या-यावर कडक कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते उदय पाटील यांनी केली आहे.
साधारण पणे फेब्रुवारी महिन्या पासून आजतागायत मोठ्या प्रमाणात आगी लावण्याचे प्रकार सुरू आहेत. शासना मार्फत दरवर्षी वनिकरणाच्या माध्यमांतून कोट्यवधी रुपये खर्च करून झाडे लावली जातात. अनेक सामाजिक संस्था पावसाळ्यात आपल्या परीने वृक्ष लागवड करतात. वृक्षप्रेमी आणि अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या आदेशानुसार बैठकीला जाणारे दासभक्त झाडे जगवण्यासाठी त्यांना पाणी घालून, भोवतालचे गवत काढून झाडांना जीवापाड जपतात.परंतु काही दृष्ट लोक दरवर्षी वनसंपदा नष्ट करतात. अशा आगीमुळे जंगलातील गवत भस्म होते आणि गुराढोरांना वणवण फिरावे लागते.
गवत नष्ट झाल्याने कागद आणि प्लास्टिक खाऊन रोग झाल्याने शेकडो गुरे दरवर्षी मरतात. वणव्यात लहान झाडे तर नष्ट होतातच त्यासोबत काही मोठी झाडे सुद्धा जळतात.यामुळे पर्यावरणाचा ह्रास होतो आणि कोट्यावधी चे नुकसान होते.आपण लावलेली वाढवलेली झाडे डोळ्यादेखत जळताना पाहून अतिशय वाईट वाटते.आणि पुनः वृक्षारोपण करण्याचे धाडस होत नाही. तालुक्याच्या प्रत्येक भागात दरवर्षी नित्यनेमाने आगी लागून फॉरेस्ट खात्याला आग लावणाऱ्या पैकी एकालाही कधीच पकडता आले नाही याचे नवल वाटते.
शासनाने अशाप्रकारे आग लावणे हा अदखलपात्र गुन्हा घोषित करून तसे करणाऱ्याला जबर शिक्षेची तरतूद केली पाहिजे. फॉरेस्ट खात्याने गावागावात आपले हेर ठेवावेत. खबर देणाऱ्याचे नाव गुप्त ठेऊन त्याला चांगले बक्षीस द्यावे.असे कृत्य करणाऱ्या किमान चारपाच जणांना पकडून त्यांच्यावर जबर कारवाई केली तर इतरांना त्याचा धाक वाटेल.जंगल संपदा वाचवायची असेल तर कडक धोरण राबविलेच पाहिजे, अन्यथा तालुक्याला स्मशानकळा येईल. असे स्पष्ट मत सामाजिक कार्यकर्ते उदय पाटील यांनी बोलताना व्यक्त केले.








Be First to Comment