Press "Enter" to skip to content

माथेरान मधील धक्क्याने शिवसेनेनेला आत्मपरीक्षणाची गरज

सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड ।

थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानमधील राजकीय उलथापालथीमुळं तेथील वातावरण अचानक तापलं आहे.माथेरान नगरपालिकेतील शिवसेनेच्या 14 नगरसेवकापैकी 10 नरसेवकांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे यावर जिल्हा शिवसेना आणि तालुका शिवसेनेने आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.

माथेरान नगरपालिकेच्या स्थापने नंतर माथेरान मध्ये शिवसेनेला साडेचार वर्षांपूर्वी प्रथमच सत्ता मिळाली होती, माथेरान नगरपालिकेत नगराध्यक्ष आणि 17 नगरसेवक आहेत. त्यापैकी 14 नगरसेवक शिवसेनेचे, दोन राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि एक कॉंग्रेसचा असे पक्षीय बलाबल आहे. तसेच दोन स्वीकृत नगरसेवक आहेत ते शिवसेनेचेच आहेत. या मधील शिवसेनेचे 9 नगरसेवक व एक स्वीकृत नगरसेवक आशा दहा नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, रायगडचे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, तालुकाध्यक्ष मंगेश म्हसकर, किरण ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापुरात चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयात हा प्रवेश केला. राज्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मावळ चे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, कर्जत विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे, माथेरान मध्ये नगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता, थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत प्रेरणा सावंत नगराध्यक्षा झाल्या, एवढे असूनही माथेरान नगरपालिकेतील शिवसेनेच्या 14 पैकी 10 नगरसेवकांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून भाजपा मध्ये प्रवेश केला.या नगरसेवकांनी शिवसेना सोडली कारण कोणतेही असो मात्र एक नाही दोन नाही चक्क 10 नगरसेवकांनी एकदम शिवसेना सोडली.

या बाबत खासदार, आमदार, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख यांना कोणतीच माहिती नव्हती का? माहिती मिळाली तर या पैकी कोणीच त्याची मनधरणी केली नाही का?त्याचे मने वळविण्याचा प्रयत्न केला नाही का ? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. शिवसेना पूर्वी संघटना म्हणून काम करीत होती त्यावेळी शिवसेनेच्या विभाग प्रमुखाच्या शब्दाला मान होता, शिवसेनेचा पक्ष झाला आणि शिवसेनेची संघटना कमकुवत झाली, शिवसैनिक राजकारणी झाला आणि मग शिवसेनेतील शिवसैनिकाला सत्तेची, पदाची लालसा आली, शिवसेनेच्या स्थापने पासून शिवसेनेत असलेले शिवसैनिक आज शिवसेनेतील राजकारणामुळे अलिप्त होवू लागले, दूर जावू लागले, सत्तेतून बाहेर पडू लागले.

यावर शिवसेनेला आत्मचिंतनाची गरज आहे. थंड हवेचे ठिकाण राजकारणी, अभिनेते, अभिनेत्री, सर्वसामान्य नागरिक सर्वांचे आवडते ठिकाण आहे, छोटी लोकवस्ती असलेल्या माथेरानचे राजकारण हे नेहमीच काहीना काही कारणास्तव चर्चेत असते.कट्टर आणि एकनिष्ठ असलेल्या शिवसैनिक यांनी पक्षाच्या पदाचा, नगरसेवक पदाचा राजीनामा देत घरी बसले असते पण त्यांना तसे न करता थेट भाजपा मध्ये प्रवेश केला यामुळे पुढील निवडणुकीत याचा फटका शिवसेनेला नक्कीच सहन करावा लागेल.

नगरपरिषदेच्या स्थापनेपासून प्रथमच मिळालेली सत्ता शिवसेनेला पाच वर्षे व्यवस्थित राबविता आली नाही. या घटनेमुळे जिल्हाप्रमुख, तालुका प्रमुख आणि पक्षाने आत्मचिंतन करणे गरजेचे आहे एवढे मात्र नक्की

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.