Press "Enter" to skip to content

कडाव ग्रामपंचायतीच्या विकास कामांची सुरुवात

तलावाच्या स्वच्छतेसह रस्ते, मो-या व वाहने पार्किंगच्या व्यवस्थेच्या कामांना वेग

सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड ।

कर्जत तालुक्यातील कडाव ग्रामपंचायतीची नुकतीच निवडणुक झाली आणि कोरोना महामारीच्या पहिल्या व‌ दुस-या लाटेमुळे विकास कामांना खीळ बसली. परंतु, जसजसे कोरोना महामारी नियंत्रणात येऊ लागली तसतसा कडाव ग्रामपंचायतीने विकास कामे मंजुर करुन ती पुर्ण करण्याचा झपाटा लावल्याचे चित्र दिसत आहे.

कडाव माणकिवली रस्त्यावरील धोकादायक झालेल्या मोरीचे नुतनीकरण करण्यात आल्यानंतर कडाव ग्रामपंचायतीने कडाव येथील तळ्याची वाडी व तलाव यामधील असलेला रस्ता दोन्ही बाजुने खचला होता त्या रस्त्याची दुरुस्ती करुन त्याठिकाणी देखील नवीन मोरी बांधण्याच्या कामास सुरुवात केली. त्याचबरोबर कडाव येथील गणपती मंदिरात येणा-या भाविकांना वाहने पार्किंग करण्यासाठी कुठेही जागा नसल्यामुळे भाविक आपली वाहने मुख्य रस्त्याच्या दुतर्फा पार्क करत होते, त्यामुळे कडाव बाजारपेठेत ट्रॅफिकची भयंकर समस्या निर्माण होत होती, भाविकांच्या वाहनांमुळे ट्रॅफिक होत असल्याने रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक भोपतराव यांच्या संकल्पनेतुन मंदिराच्या दक्षिण बाजुला तलावाच्या किनारी भरावा करुन वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.

उन्हाळ्यात कडाव गावातील तलावात मुबलक पाणी साठा होत नसल्यामुळे गावातील विहिरी व बोअरवेलचे पाणी आटुन जाते त्यामुळे गावातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. म्हणुन कडाव ग्रामपंचायतीचे सरपंच अशोक किसन पवार यांनी तलावातील गाळ व वाढलेली झाडे झुडपे स्वतःच्या निगराणीत काढुन टाकल्यामुळे पावसाळ्यात पावसाचे पाणी तळ्यात अधिक साचेल व गावातील विहिरी व बोअरवेलचे पाणी आटणार नाही. तलावाच्या स्वच्छतेबरोबरच तलावाच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात झालेले पाणी बाहेर जाण्यासाठी देखील अनंता उपाध्ये यांच्या घराजवळ तलावाला पाईप टाकुन नव्याने मोरी बांधण्यात आली आहे.

याशिवाय कडाव तळ्याची वाडी येथील आदिवासी बांधवांसाठी लवकरच स्वतंत्र नळपाणी योजना सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक भोपतराव यांनी दिली. अशाप्रकारे कडाव ग्रामपंचायतीकडुन अल्पावधीत होत असलेल्या विकास कामांमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.