Press "Enter" to skip to content

वेलशेत ते आमडोशी फाटा रस्ता पहिल्याच पावसात उखडण्यास सुरूवात

रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप

सिटी बेल । नागोठणे । महेश पवार ।

गेल्या चार – पाच वर्षांपासून दुरूस्ती व डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत असलेला वेलशेत फाटा वरवठणे मार्गे आमडोशी फाटा हा रस्ता डांबरीकरणा नंतर पहिल्याच पावसात उखडण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळेच या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष किशोरभाई म्हात्रे यांनी केला आहे. याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम खात्याने योग्य ती दखल घेण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

सन २०१६ पासून नागोठणे विभागातील वेलशेत फाटा, वरवठणे ते आमडोशी फाटा पर्यंतचा सुमारे चार किलोमीटरचा रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत होता. या रस्त्याचे काम होण्यासाठी किशोरभाई म्हात्रे यांनी बांधकाम खात्याच्या अलिबाग विभागाकडे पाठपुरावा केला होता. तसेच यासाठी स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनीही पेण सुधागड मतदार संघांचे आमदार रविशेठ पाटील यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर आमदार पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून वेलशेत फाटा, वरवठणे ते आमडोशी फाट्यापर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात झाल्यामुळे प्रवासीवर्ग व स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले होते. परंतु हे समाधान जास्त दिवस टिकले नाही. कारण पंधरा दिवसातच रस्त्यावर टाकलेले डांबर निघून जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर किशोरभाई म्हात्रे व वाहन चालकांनी संताप व्यक्त केला आहे. रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई करून ठेकेदारास रस्त्याचे डांबरीकरण व्यवस्थित करण्यास लावावे अशी मागणी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे केली आहे. याबाबत आमदार रविशेठ पाटील यांनीही लक्ष द्यावे अशी विनंतीही करण्यात आली आहे.

यासंदर्भात किशोरभाई म्हात्रे यांनी सांगितले की, या रस्त्याच्या बी.बी.एम. च्या कामाला काही दिवसांपूर्वी सुरवात होऊन बहुतांशी काम पूर्ण देखील झाले. परंतु काही दिवसातच या रस्त्यावर टाकलेले डांबर निघून जाऊ लागले आहे. येत्या काही दिवसातच नियमित पावसाळा सुरु होणार असून पावसाळ्यात रस्त्यावरील डांबर निघून जाऊन रस्त्याची अवस्था जैसे थे अशीच होणार असल्याचे आता चिन्ह दिसू लागली आहेत. घर बांधताना जोत्याचे काम मजबूत नसेल तर वीट बांधकाम टिकूच शकत नाही. आता रस्त्यावर बी. बी.एम. मारले आहे त्यावर आणखी दोन कोट येतील म्हणूनच बी. बी.एम चे काम महत्त्वाचे होते असेही किशोर म्हात्रे म्हणाले. रस्त्याच्या बी.बी.एम.ला मजबूतीकरण न दिल्यामुळे रस्त्यावरील डांबर निघायला लागले असून आता पहिल्याच पावसात रस्त्यावर खड्डे पडायला सुरवात होईल अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्याचे व या रस्त्याशी संबधित कनिष्ठ अभियंता डी.एम.पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, पोयनाड ते आमडोशी फाटा या २९ किलोमीटर मार्गाच्या डांबरीकरण कामातीलच हा एक टप्पा असुन सध्या या रस्त्यावर केवळ बी.बी.एम चे काम करण्यात आले असून त्यानंतर अजून दोन कोट त्यावर येणार असल्याने तसेच या रस्त्याची देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी १० वर्षे संबधित ठेकेदारावरच असल्याने या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर ते चांगल्या दर्जाचेच होईल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.