कोंडगाव, चेराठी व एकळघर येथे इमारतींचे नुकसान : वीज वितरणचेही अंशतः नुकसान सुदैवाने कोणतीही जिवितहानी नाही
सिटी बेल । नागोठणे । महेश पवार ।
“तौत्के” चक्रीवादळाचा प्रभाव रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर मध्यरात्रीनंतर जाणवू लागल्यानंतर मध्यरात्रीच्याच सुमारास नागोठणे शहर व परिसरालाही या चक्रीवादळाने झोडपून काढले. मध्यरात्री पासूनच परिसरात व आदिवासी वाड्यांवर सर्वत्र सोसाट्याच्या वादळ वा-यासह व मुसळधार पाऊस असे चित्र होते. मात्र सोमवारी दिवसा पावसाचे प्रमाण किरकोळ असले तरी वादळवारा मात्र मोठ्या प्रमाणात होता. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास वादळवा-याचा वेग काहीसा कमी झाल्याचे दिसून आले. मात्र पावसाची संततधार नागोठणे व परिसरात सायंकाळ पर्यंत सुरूच होती.
या चक्रीवादळामुळे नागोठणे ग्रामीण भागात झाडे कोसळण्याच्या तुरळक घटना घडल्या आहेत. नागोठण्याजवळील कोंडगाव ग्रामपंचायत हद्दितील कातळावाडी येथे समाज मंदिरावरील सिमेंटचे पत्रे या चक्रीवादळामुळे उडून नुकसान झाले आहे. तसेच नागोठणे विभागातील उंचावरील ठिकाण असलेल्या चेराठी आदिवासी वाडी येथील मंदिरावर झाड कोसळ्याने तेथील मंदिर व समाज मंदिराच्या इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
याशिवाय एकळघर येथील राजिप शाळेचे सिमेंटचे पत्रे उडून शाळेच्या इमारतीचेही नुकसान झाले आहे. तर नागोठणे व परिसरातील वीटभट्ट्यांचेही या अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जिवितहानी या चक्रीवादळाने नागोठणे परिसरात झालेली नाही.

या चक्रीवादळामुळे विज वितरण कंपनीचेही विद्युत तारा व कंडक्टर तुटणे, काही ठिकाणी विजेचे खांब पडणे अशाप्रकारचे नुकसान झाले असुन त्यांची तपासणी करण्यात येत आहे. त्यानुसार बाळसई गावापर्यंतचा वीजपुरवठा सुरु करण्यात आला असून वादळवारा कमी होताच व आवश्यक ती दुरूस्ती करुन इतर भागातील वीजपुरवठाही लवकरात लवकर पूर्ववत करण्यात येईल असे वीजपुरवठा वितरणचे नागोठण्यातील कनिष्ठ अभियंता वैभव गायकवाड यांनी सांगितले.
दरम्यान नागोठणे विभागातील ग्रामीण भागांतही काही नागरिकांच्या छोट्या घरांवरचे कौले व पत्रे या चक्रीवादळामुळे उडाल्याने तेथील नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. याशिवाय येथील ज्या शेतकऱ्यांच्या आंबे, काजू पिकांचेही नुकसान झाले असेल त्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन त्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी नागरिक व शेतकऱ्यांतून होत आहे.








Be First to Comment