पावसामुळे वीटभट्ट्यांच्या धुरात वाढ : नागोठणे परिसर धुरमय
प्रदूषण करणारी कंपनी व विटभट्टी मालकांवर कारवाईची मागणी
सिटी बेल । नागोठणे । महेश पवार ।
नागोठण्या लगतच असलेल्या रिलायन्स कंपनीच्या धूर ओकणा-या चिमणीमुळे तसेच नागोठणे शहर व परिसरात असलेल्या वीटभट्ट्या यांच्यामुळे नागोठणे शहर व परिसर प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे. याबाबत प्रदूषण मंडळाने लक्ष घालून संबधितांवर ठोस कारवाई करुन नागोठणे शहर वपरिसराला प्रदूषणातून मुक्त करावे अशी मागणी नागोठणेकर व परिसरांतील नागरिकांकडून केली जात आहे.
पावसाळा जवळ आल्याने नागोठणे परिसरात असलेल्या या मोसमातील शेवटच्या वीटभट्ट्या पेटविण्यात आल्या आहेत. या वीटभट्ट्या सर्वत्र धूर ओकत असतांनाच गेले दोन दिवस सायंकाळी नागोठणे परिसरात पडलेल्या मॉन्सूनपुर्व पावसामुळे या वीटभट्ट्या अधिकच धुमसत गेल्या आणि त्यामुळेच धुराचे प्रचंड लोट नागोठणे शहरात आले व परिसरही धुरमय झाला.

नागोठणे परिसरात वाकण पासून ते कोलेटी पर्यंतच्या अनेक गावांच्या हद्दित गेल्या अनेक वर्षांपासुन या वीटभट्ट्या उभारण्यात येत आहेत. वीटभट्ट्यांमध्ये दगडी कोळसा वापरण्यात येत असल्याने या वीटभट्ट्या रात्रीच्या वेळी पेटविण्यात आल्यानंतर रात्रभर या वीटभट्ट्या धुमसत राहतात. त्यामुळे सकाळच्या वेळेतही धुराचे प्रचंड लोट नागोठणे परिसरात तसेच महामार्गालगत दिसुन येत आहेत. या सर्व प्रकाराचा त्रास सकाळी मोकळ्या हवेत फिरण्यासाठी बाहेर पडणारे नागरिक व महिला वर्गाला तसेच महामार्गावरुन प्रवास करणा-या प्रवाशांना होत आहे. या विषारी धुरामुळे नागरिकांना श्वसनाचे विकार होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. हा सर्व प्रकार गेल्या काही दिवसांपासुन सुरु आहे. असे असतांनाच पावसामुळे वीटभट्ट्या अधिकच धुमसल्याने धुराचे प्रचंड लोट नागोठणे शहरात येत आहेत.
असे असुनही येथील वीटभट्टी व्यावसायिक वीटभट्ट्यांमुळे होणारे वायप्रदुषण, ठराविक अंतरावर मानवी वस्तीपासुन लांब वीटभट्टी उभारण्याचा नियम तसेच गावाजवळील लोकवस्ती लगतच पेटविलेल्या वीटभट्ट्या याबद्दल काहीच न बोलता या सर्व गैरप्रकाराला बगल देत आहेत. अशाप्रकारे मानवी वस्ती नजीकच्या वीटभट्ट्यांना संबंधित खाते तरी कशी परवानगी देते हा प्रश्न आहे. त्यामुळेच आता प्रदुषण करणा-या अशा वीटभट्टी व्यावसायिकांवर प्रदुषण नियंत्रण मंडळानेच कारवाई करण्याची मागणी नागरिकांतुन होत आहे.
दरम्यान कोरोना संसर्ग वाऱ्यासारखा पसरत असल्यामुळे नागरिकांच्या जीवितास आधीच धोका निर्माण झाला आहे. त्यातच नागोठण्यातील या प्रदूषणामुळेही नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. या प्रदूषणामुळे नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. तसेच हवेतील ऑक्सिजनही प्रदूषणामुळे अशुद्ध होऊ शकतो. त्यातच महाराष्ट्र शासनाकडे ऑक्सिजनचा तुटवडा देखील आहे. त्यामुळे भविष्यात हे प्रदूषण नागरिकांच्या जीवावर बेतू शकते याची प्रदूषण मंडळाने वेळीच दखल घ्यावी व नागोठणेकरांना दिलासा द्यावा अशीही मागणी नागरिकांकडून केली जात आहे.








Be First to Comment