Press "Enter" to skip to content

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हृदयविकार वाढले !!

नियमित आरोग्य तपासणी, योग्य आहार व व्यायाम या त्रिसूत्रीवर भर देण्याचा डॉक्टरांचा सल्ला

सिटी बेल । आरोग्य प्रतिनिधी ।  

भारतात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल आहे. मात्र जगभरातील अनेक देश कोरोनाची दुसरी लाट झेलून तिसऱ्या लाटेला थोपवण्याची तयारी करत आहेत, परंतु भारत आजही दुसऱ्या लाटेसमोर हतबल झालेला दिसत आहे, कारण कोरोनासोबतच इतर जीवघेणे आजार वाढत चालले असून यात प्रामुख्याने हृदयविकाराचा समावेश आहे.

कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर मृत्यूचे सर्वाधिक कारण ह्रदयविकार असून तो कोरोनाबाधितांच्या मृत्यूची जोखीम वाढविणारा ठरू शकतो. त्यामुळे हृदयविकार टाळण्यासाठी अधिक गंभीरतेने लक्ष द्यावे लागणार असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे. कोरोनाचे इलाज करताना वापरलेली उच्च पॉवरची औषधे व कोरोनामुक्त झाल्यानंतर नागरिकांमधील वाढलेला निष्काळजीपणा वाढत असल्याने तीव्र हृदयविकाराचा धक्का , हृदय बंद पडून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहेत.

याविषयी अधिक माहिती देताना शुश्रूषा हार्ट केयर सेन्टर व मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व हृदय शल्यविशारद डॉ. संजय तारळेकर सांगतात, ” भारतात ७० वर्षांखालील लोकांच्या मृत्यूंपैकी हृदयविकारामुळे होणाऱ्या  मृत्यूचे प्रमाण हे साधारण ५२ ते ५५ टक्के  आहे.केवळ वृद्धच नव्हेत तर तरुणही त्यास बळी पडत आहेत. अगदी तिशीतील तरुणांना हृदयविकार होण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्याची लागण ही अनेक अनुवांशिक आणि पर्यावरणातील घटकांवरही अवलंबून असते. 

बैठी जीवनशैली, आहारात वाढलेले जंक फूड – वाढते धुम्रपान त्यामुळे तरुणांमध्ये हृदयविकार बळावतात .हृदयविकार असणाऱ्या रुग्णांना कोरोना व्हायरसची लागण होण्याचा धोका हा सर्वांधिक असतो. या रूग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने संसर्गाची लागण होऊ शकते म्हणुनच कोरोना झाल्यांवर अथवा कोरोना मुक्तीनंतर  पुढील तीन महिने आपल्या हृदयाची काळजी घेणे महत्वाचे आहे. ऑक्सफर्ड जर्नलने नुकताच यावर अभ्यास केला आहे. त्यातून ही माहिती उघड झाली आहे. कोरोनामुळे गंभीर आजारी असलेल्या ५० टक्के रुग्णांचे हृदय बरे झाल्यानंतर महिन्याभरानंतर डॅमेज होते. त्यामुळे बरे झाल्यानंतरही आपल्या हृदयाची  नियमित तपासणी करणे   गरजेचं झालं आहे, कारण त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यावरही रुग्णाला धोका निर्माण होऊ शकतो, असं या अभ्यासात म्हटलं आहे. कोरोनाचे इन्फेक्शन शरीरात इंफ्लेमेशनला ट्रिगर करत असते. त्यामुळे हृदयाच्या मांसपेशी कमकुवत होतात. त्यामुळे हृदयाचे ठोके वाढतात. तसेच ब्लड क्लॉटिंग समस्या निर्माण होऊ लागते. दुसरा व्हायरस थेट आपल्या रिसेप्टर सेल्सवर हल्ला करतो.

एसीईटू रिसेप्टर्स म्हणून ओळखला जातो. मायोकार्डियम टिश्यूच्या ता जाऊनही तो नुकसान करतो. वेळीच देखभाल केली नाही तर हृदयविकाराचा झटका येण्याची दाट शक्यता असते. कोरोना रुग्णांना छातीत दुखण्याचा त्रास होत असेल किंवा कोरोना होण्यापूर्वीच त्यांना हृदयाशी संबंधित आजार असेल तर त्यांनी तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. “मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच काही इतर गंभीर आजार असतील तर या कोरोना संक्रमण काळामध्ये विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यास होते. वृद्ध तसेच मधुमेही, हृदयविकार वा कुठलाही आजार असलेल्यांमध्ये रोगप्रतिकार शक्ती कमी असल्याने कोरोनाचा संसर्ग बळावण्याची शक्यता अधिक असल्याची माहिती हृदय शल्यविशारद डॉ. संजय तारळेकर  यांनी दिली. हृदयविकार असलेल्या रुग्णांनी  हृदयाची नियमित आरोग्य तपासणी , योग्य आहार व डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार व्यायाम करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.