खासगी सोसायट्यांमध्ये लसीकरणासाठी डॉ मनीषा कायंदे यांनी मानले आदित्य ठाकरे यांचे आभार
सिटी बेल । मुंबई ।
लसीकरणासाठी लागलेल्या लांबच लांब रांगा व या रांगांमुळे जेष्ठ नागरिकांना होणारा त्रास तसेच सोशल डिस्टंसिन्ग न होणारे पालन या सर्व बाबींचा विचार करून शिवसेना आमदार डॉ मनीषा कायंदे यांनी केलेल्या खाजगी सोसायट्यांमध्ये लसीकरणाच्या मागणीला यश आले असून मुंबई महानगरपालिकेने लसीचा साठा विचारात घेऊन खासगी रुग्णालयांना सोसायट्यांचा आवारात लसीकरण मोहिम सुरु करण्याची परवानगी दिली आहे.
शिवसेनेच्या आमदार डॉ. मनिषा कायंदे यांनी नुकतीच राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री मा.आदित्य ठाकरे यांच्याशी ऑनलाईन संवाद साधून सोसायट्यांमध्ये लसीकरण सुविधा सुरु करण्याची विनंती केली होती व या मागणीबाबत श्री आदित्य ठाकरे यांनी सकारात्मक प्रतीसाद दिला होता. मुंबई महानगर पालिकेचा हा निर्णय खरोखरच स्वागतार्ह असून देशामध्ये कदाचीत खाजगी सोसायट्यांमध्ये लसीकरणासाठी परवानगी देणारी ही पहिली महानगरपालिका असेल व यासाठी मी महापौर श्रीमती किशोरीताई पेडणेकर तसेच मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त श्री इक्बाल चहल व महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (आरोग्य), श्री सुरेश काकानी यांचेही अभिनंदन करीत आहे अशी माहिती शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी दिली.
या निर्णयानुसार मुंबईतील सोसायट्यांना पालिकेने लसीकरणासाठी ठरवून दिलेले प्रोटोकॉल पाळावे लागणार आहेत. तसेच खासगी रुग्णालयांसाठी सरकारने ठरविलेल्या किंमतीवर या लसी सोसायटीतील सदस्यांना मिळणार आहेत. खासगी रुग्णालयांना लसीकरण दरम्यान संबंधित सोसायट्यांमधील नागरिकांची लसीकरणानंतर डॉक्टरांचा निरीक्षणाखाली ठेवत योग्य काळजी घ्यावी लागणार आहे. तसेच पालिकेने लसीकरणासाठी ठरवून दिलेल्या नियमांचे योग्य पालन करावे लागणार आहे.








Be First to Comment