नागोठणे लायन्स क्लबचे अध्यक्ष संदीप नायर यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
सिटी बेल । नागोठणे । महेश पवार ।
नागोठणे लायन्स क्लबचे विद्यमान अध्यक्ष व येथील मल्ल्याळम समाजातील एक सेवाभावी व्यक्तिमत्त्व तसेच हायवेनाका येथील श्री लक्ष्मी टायर्स दुकानाचे मालक संदीप सुकूमार नायर (वय ३९) यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
संदीप नायर यांच्या निधनाचे वृत्त समजताच नागोठणे शहरासह संपूर्ण परिसरात आण्णा म्हणून प्रसिध्द असलेल्या कै. संदीप यांच्या मित्रपरिवारातून हळहळ व्यक्त करण्यात आली. संदिप नायर यांना सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास त्रास जाणवू लागल्याने त्यांना त्यांच्या कर्मचाऱ्याने येथील कोकणे हाॅस्पीटल मध्ये नेले होते. त्याच ठिकाणी त्यांना चक्कर येऊन ते पडले असता डाॅ. कोकणे यांनी त्यांना उपचारासाठी पुढे घेऊन जाण्यास सांगितले होते. मात्र पेण येथील म्हात्रे हाॅस्पीटल मध्ये पोहोचताच डाॅक्टरांनी त्यांना तपासले. मात्र त्याआधिच त्यांची प्राणज्योत मालवली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कै. संदीप नायर यांच्यावर येथील अंबा घाटावरील वैकुंठ स्मशानभूमीत रात्री दोन वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी त्यांच्या मित्रपरिवारातील अनेकांना आपले अश्रू आवरता आले नाही. कै. संदीप नायर यांच्या पश्चात पत्नी विश्वकला, नऊ वर्षीय ज्युतिका व चार वर्षीय राधिका या दोन मुली, आई-वडिल यांच्यासह मोठा परिवार आहे.
नागोठण्यातील हायवेनाका येथे टायर पंक्चर व टायर विक्रीचे दुकान असलेल्या संदिप नायर यांना समाजकार्याची आवड असल्याने त्यांनी आपला व्यवसाय सांभाळून गेली अनेक वर्षे नानिज (जि.रत्नागिरी) येथील जगद््गुरू स्वामी नरेंद्र महाराज संस्थानच्या नागोठण्यातील रुग्णवाहिकेचे चालक म्हणून मुंबई – गोवा महामार्गावरील अनेक अपघातग्रस्तांना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणून त्यांचे प्राण वाचविण्याचे काम केले होते. त्यानंतरही नागोठणे लायन्स क्लबचे सभासद होऊन त्यांनी आपली समाज कार्याची आवड जोपासली होती. मनमिळावू व
लहान मुलांप्रती प्रेमळ असलेल्या कै. संदीप यांनी पाच निराधार मुलांना चप्पल, छत्री, दप्तर यांसह त्यांच्या शिक्षणाचा खर्च गेल्या चार वर्षांपासून उचलला होता. अनेक शाळांतील कार्यक्रमात प्रत्येक मुलाला बिस्कीट पुडा व चॉकलेट वाटपासह तीन ते चार शाळांना दरवर्षी स्वतःच्या वाढदिवशी १२ डिसेंबरला अन्नदान करण्याचा उपक्रम त्यांनी गेली चार वर्षांपासून राबविला होता. महाडच्या सावित्री पुलाच्या दुर्घटनेच्या वेेेळीही सतत चार दिवस त्यांनी मृतदेह शोधकार्यात व ते उचलण्यात मदतकार्य केेेेले होते. त्यांच्या या सामाजिक कार्यामुळेच त्यांची नागोठणे लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी वर्णी लागली होती. अध्यक्ष पदावर आल्यापासून आपल्या सहका- यांच्या मदतीने त्यांनी अनेक समाजिक उपक्रम राबविले होते.
मनमिळाऊ व समाजभिमुख संदीप नायर यांच्या जाण्याने नागोठण्यातील एक माणसातील देवमाणूस निघून गेल्याची भावना सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे. कै. संदीप नायर यांचे दशक्रिया विधी मंगळवार दि. २० एप्रिल रोजी उध्दर येथे तर उत्तरकार्य – तेरावे शुक्रवार दि. २३ एप्रिल रोजी त्यांच्या नागोठण्यातील राहत्या घरी होणार असल्याचे नायर परिवाराकडून सांगण्यात आले.








Be First to Comment