Press "Enter" to skip to content

श्रीवर्धन येथील हरिहरेश्वरसह, मारळ व कळींजे गाव पुन्हा प्रकाशमान


वीजपुरवठा पूर्ववत करण्यात कनिष्ठ अभियंता आदित्य जाधव यांची उत्तम कामगिरी

सिटी बेल लाइव्ह / संजय कदम #

‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या उत्पत्ती स्थान असलेले हरिहरेश्वर गाव, एक सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ असून तिथे हरिहरेश्वर देवस्थान आहे. निसर्ग’ चक्रीवादळामुळे येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. अनेक घरांचे पत्रे उडाले, विद्युत तारांवर मोठ मोठे वृक्ष पडले होते,तसेच अनेक विद्युत खांब उन्मळून पडले होते. यामुळे, महावितरण विद्युत यंत्रणेचे प्रचंड नुकसान झाले होते. अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. भांडूप परिमंडलच्या मुख्य अभियंता सौ.पुष्पा चव्हाण यांनी वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी विशेष चमू तयार केल्या व त्यांना आवश्यक साहित्य व मनुष्यबळ उपलब्ध करून दिले. तसेच वीजपुरवठा सुरु करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. दिवसरात्र अथक परिश्रमानंतर हरिहरेश्वर मंदीर व आज हरिहरेश्वर गांव, तसेच मारळ व कळींजे गाव पुन्हा प्रकाशमान झाले आहेत.

हरिहरेश्वर येथील भेंडखोळ व शिवाजीनगर परिसराचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.

श्रीवर्धन उपविभागातील हरिहरेश्वर, मारळ व कळींजे गाव हे जास्त प्रभावित झाल्याने वीजपुरवठा पुन्हा सुरु करण्यासाठी, विशेष नियोजनाची अत्यंत गरज होती. अधीक्षक अभियंता पेण, दीपक पाटील व गोरेगाव विभागाचे कार्यकारी अभियंता अप्पासाहेब खांडेकर यांनी प्रत्यक्ष या गावांना भेट देऊन नुकसानाची पाहणी केली.भांडूप परिमंडलातून मुख्य अभियंता यांनी, कार्यकारी अभियंता देवेंद्र उंबरकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, व्यंकटेश कासल,उपकार्यकारी अभियंता,अविनाश तंबाखे, उपकार्यकारी अभियंता, अनिल जगजाप यांची या कामी विशेष नियुक्ती केली. त्यांनी मनुष्यबळ व साहित्यचे नियोजन करून या कामात मोलाची मदत केली. तसेच खांडेकर व उंबरकर यांनी एजेन्सीसोबत रोज सायंकाळी बैठक घेऊन कामाचे सुक्ष्म नियोजन केले.

हरिहरेश्वर, मारळ व कळींजे येथे 60 उच्चदाब खांब, 7 डीटीसी, 88 लघुदाब खांब चक्रीवादळामुळे बाधित झाले होते. उपकार्यकारी अभियंता तंबाखे यांच्या देखरेखीत कनिष्ठ अभियंता आदित्य जाधव, महावितरणचे लाईन स्टाफ व तेथील ग्रामस्थांनी युद्धपातळीवर काम करून हा वीजपुरवठा सुरु केला आहे. या कामात, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे श्री सदस्यांचे ही विशेष सहकार्य महावितरणला लाभले आहे. आदित्य जाधव यांनी येथील वीजपुरवठा सुरळीत करण्याकरिता विशेष मेहनत घेतली असून त्यांचे कौतुक महावितरणच्या अधिकाऱ्यांसह हरिहरेश्वर गावचे ग्रामस्थ तसेच सरपंच देखील करत आहेत.लाईन स्टाफचे मार्गदर्शन करून ग्रामस्थांच्या मदतीने घनदाट जंगलात पडलेले उच्चदाब खांब, डीटीसी व लघुदाब खांब पुन्हा प्रस्थापित करण्याचे कठीण काम पार पाडले. ड्राईव्हर उपलब्ध नसल्यावर, वेळ जाऊ नये म्हणून त्यांनी स्वतः पिकअप चालवून आवश्यक साहित्य कामाच्या ठिकाणी नेले. या ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत करण्यात त्यांची मुख्य भूमिका आहे. महावितरणच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी केलेल्या अहोरात्र प्रयत्नांमुळे बागमांडला या फिडर वरील हरिहरेश्वर मारळ, काळिंजे पुन्हा एकदा प्रकाशमान झाले आहेत. याशिवाय, बागमांडला व दांडा गावचा वीजपुरवठा लवकरच सुरु होणार आहे. सदर गावे बागमांडला फीडरवर असून, या फीडरचा वीजपुरवठा चालू करण्यासाठी कार्यकारी अभियंता देवेंद्र उंबरकर, उपकार्यकारी अभियंता अनिल जगजाप, व कनिष्ठ अभियंता आदित्य जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.

मुख्य अभियंता भांडूप, सौ. पुष्पा चव्हाण यांनी हरिहरेश्वर, मारळ व इतर गावांमध्ये वेळोवेळी साईटवर जाऊन कामांची पाहणी केली व वीजपुरवठा लवकर सुरु करण्यासाठी पाठपुरावा केला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.