फसवणूक झालेल्या उमेदवारांनी दलालांविरोधात पोलीसात गुन्हे दाखल करावेे – आनंद भोसले
देवा पेरवींच्या आरोपानंतर मंडळाला जाग
पेण- दि.20 ( प्रतिनिधी )रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या सुरक्षारक्षक भरती करिता काही दलालांनी आर्थिक व्यवहार करून उमेदवारांची फसवणूक केली असल्याचे काही वर्तमान पत्रांत बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर मंडळाला जाग आली आहे. अश्या फसवणूक झालेल्या उमेदवारांनी ताबडतोब या सर्व दलालांन विरोधात स्थानिक पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करावा असे आवाहन रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे चेअरमन आनंद भोसले यांनी केले आहे.
पेण प्रेस क्लबचे अध्यक्ष देवा पेरवी यांच्याकडे अनेक युवकांनी नाव न जाहीर करण्याच्या अटीवर तक्रारी केल्या होत्या. यावेळी पेरवी यांनी सदर घोटाळ्याची शहानिशा करून यासंदर्भात आवाज उठवला आहे. रायगड जिल्ह्यातील अनेक बेरोजगार उमेदवारांकडून प्रत्येकी दीड ते दोन लाख रुपयांची वसुली करण्यात आल्याचा आरोपही देवा पेरवी यांनी केला आहे. यासंदर्भात रायगड सुरक्षा रक्षक मंडळाचे चेअरमन आनंद भोसले हे खुलासा करताना म्हणाले की, गोरगरीब, आदिवासी व गरजू उमेदवाराच्या अडाणीपणाचा तसेच असहाय्यतेचा जर कोणी दलाल फायदा घेत असेल तर अशा दलालांवर गुन्हा दाखल करायलाच पाहिजे. पास झालेल्या उमेदवारांचे रेकॉर्ड ऑनलाइन आहेत. त्यामुळे अशा उमेदवारांच्या नोकरीला कोणताही धोका नाही. तरी अश्या सर्व उमेदवारांनी समोर येऊन स्थानिक पोलिसात तक्रार दाखल करावी. अशा उमेदवारांना मंडळाकडून संरक्षण देण्यात येईल अशी ग्वाही सुद्धा आनंद भोसले यांनी दिली
भरती नसून केवळ नोंदणी प्रक्रिया
रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ तर्फे कोणत्याही प्रकारची भरती सुरू नसून ही केवळ नोंदणी प्रक्रिया आहे. उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील अनेक कंपन्यांच्या व वेगवेगळ्या संस्थांकडून येणाऱ्या मागणीप्रमाणे उमेदवारांना त्या संस्थेमार्फत नोकरी उपलब्ध करून देण्यात येते.
ऑनलाइन प्रक्रियेत दलालांपासून दूर राहावे
सुरक्षारक्षक मंडळांमध्ये प्रतीक्षा यादी बनवण्याचे काम हे ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत असून इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीचा वापर करावा. तसेच संधिसाधू दलालांंपासून दूर राहावे. शासनाच्या निर्देशाप्रमाणे सेराईज टेक सोल्युशन या एजन्सीमार्फत अर्ज मागवणे, छाननी करणे व मैदानी परीक्षा तसेच मेसेज पाठवणे हे कार्य करण्यात येते. उमेदवारांनी ऑनलाइन प्रक्रियेत सहभागी व्हावे तसेच दलालांशी संपर्क करू नये.
घोटाळ्यात कर्मचारी आढळल्यास कारवाई करणार
अनेक वृत्तपत्रामध्ये आलेल्या बातमीनुसार जर सदर घोटाळ्यात मंडळाचा कोणताही कर्मचारी आढळल्यास त्याला तात्काळ कामावरून कमी करण्यात येईल असेही भोसले यांनी स्पष्ट केले.
2खटल्यासाठी पेण प्रेस क्लब देणार वकील
नोकरी मिळवण्याकरिता पदरमोड करून व्याजी पैसे घेऊन लाखो रुपये दलालांना देणाऱ्या व नोकरी न मिळालेल्या बेरोजगार युवकांनी पुढे येऊन कोणालाही न घाबरता दलालां विरोधात गुन्हा दाखल करावा. अश्या सर्व बेरोजगार युवकांच्या पाठीमागे पेण प्रेस क्लब खंबीरपणे उभा राहील. फसवणूक झालेल्या बेरोजगार युवकांच्या खटल्या साठी वकिलाची व्यवस्था सुद्धा पेण प्रेस क्लब तर्फे करण्यात येईल अशी ग्वाही पेण प्रेस क्लबचे अध्यक्ष देवा पेरवी यांनी दिली.






Be First to Comment