Press "Enter" to skip to content

पाताळगंगा नदीवरील जुन्या पुलाला थुकपट्टी लावण्याच्या एमायडिसी प्रशासनाच्या हालचाली

जुन्या पुलाची जुजबी दुरुस्ती नको, आम्हाला हवा आहे नवा पूल

शेकाप नेते दशरथ गायकर यांची पालकमंत्र्यांच्या कडे मागणी

सिटी बेल । रसायनी ।

पाताळगंगा औद्योगिक वसाहतीमध्ये वाहनांना ये-जा करण्यासाठी पाताळगंगा नदीवर असणाऱ्या जुन्या पुलाला जुजबी दुरुस्ती करून तो पुन्हा कार्यान्वित करण्याच्या हालचालींना वेग आला असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. ही माहिती प्राप्त होताच शेकाप नेते दशरथ गायकर यांनी पालकमंत्री आदिती ताई तटकरे यांच्याकडे सदर पुलाची जुजबी दुरुस्ती न करता तो संपुर्णपणे पाडून त्या ठिकाणी नवीन पूल उभारावा अशी मागणी केली आहे.
        याबाबत आमच्या प्रतिनिधीने दशरथ गायकर यांच्याशी संपर्क साधून अधिक माहिती घेतली असता ते म्हणाले की, सध्याच्या घडीला पाताळगंगा औद्योगिक वसाहतीमध्ये प्रवेश करण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा पूल समजला जातो. या पूलाच्या शेजारीच नवीन पूल बांधला असल्याने अवजड वाहने कर्मचारी कंपनी चालक व आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ नवीन पुलावरून ये-जा करत असतात. नजिकच्या काळामध्ये औद्योगिक वसाहतीमधील रस्ते चार पदरी झालेले आहेत. नवीन पूल दोन पदरी असल्याकारणाने बऱ्याचदा या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते.या वाहतुकीच्या कोंडीवर उपाय म्हणून एमआयडीसी प्रशासनाने जुन्या पुलाची दुरुस्ती करून तो कार्यान्वित करण्याचा घाट घातला आहे.परंतु असे करणे म्हणजे अपघाताला आमंत्रण देण्याचा प्रकार असल्याचे माझे स्पष्ट म्हणणे आहे. माझी हीच भूमिका मी एका निवेदनाद्वारे पालकमंत्री आदिती ताई तटकरे यांना कळवली आहे.
       गायकर पुढे म्हणाले की जुना पूल हा दुरुस्तीच्या पलिकडे गेला आहे.१९८९, २००५,आणि २०११ साली झालेल्या महापुरात या पुलाला प्रचंड नुकसान सहन करावे लागले होते.पुलाच्या खालील बाजूकडून निरीक्षण केले असता या पुलाचे काही तुकडे कोसळत असल्याचे तुम्हाला दिसेल. औद्योगिक वसाहती मध्ये येणारी बहुतांश वाहने ही अवजड प्रकारातील असतात. जीर्ण झालेल्या या पुलाला कितीही ठिगळं लावली तरी अशी अवजड वाहतूक पेलण्याची या पुलाची क्षमता नसल्याचे मी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.त्यामुळे एकंदरीतच औद्योगिक वसाहतींमधील वाढते वाहतुकीचे प्रमाण पाहता जूना पूल तोडून टाकून त्या ठिकाणी दुसरा नवा पूल उभारणे ही काळाची गरज आहे. आदिती ताई तटकरे या अत्यंत धडाडीच्या व कार्यकुशल नेत्या आहेत. मला खात्री आहे की माझ्या निवेदनाचे अवलोकन केल्यानंतर माझ्या मागणीला त्या सकारात्मक प्रतिसाद देतील.

या निवेदनामध्ये दशरथ गायकर यांनी आदिती ताई तटकरे यांना सावित्री नदी पूल दुर्घटनेची आठवण करून देत त्याच स्वरूपाचा अपघात होण्याची दाट शक्यता वर्तविली आहे. जुन्या पुलाचे पुनरुज्जीवन करणे म्हणजे नागरिकांचा जीव धोक्यात टाकण्याचा धंदा असून त्यास अटकाव करणे हे माझे परम कर्तव्य आहे असे दशरथ गायकर यांचे म्हणणे आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.