Press "Enter" to skip to content

उरण डाऊरनगर येथील रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम अपुर्ण

ठेकेदाराला डांबर मिळत नसल्याचा अधिकाऱ्यांचा दावा : शिवप्रेमींत नाराजीचा सूर

सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू ।

उरण डाऊरनगर येथील रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम गेली ३ ते ४ महिन्यापासून सुरू आहे. परंतु आज २ दिवसांवर शिवजयंती येऊनही रस्त्याचे काम अधुरे असल्याचे दिसत आहे. याबाबत सिडको अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी डांबर मिळत नसल्याने काम रखडल्याची कबुली दिली आहे.

सिडकोच्या माध्यमातून डाऊरनगर येथील द्रोणागिरी किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम गेली ३ ते ४ महिन्यापासून सुरू आहे. परंतु सदर रस्त्याचे काम करताना ठेकेदाराने कोणतीही साफसफाई न करता खडी पसरवून ठेवली आहे. त्यामुळे सदर रस्त्याचे काम हे दिलेल्या नियमानुसार नसून निकृष्ट दर्जाचे असल्याचे ग्रामस्थ सांगतात. याबाबत वृत्त प्रसिद्ध होऊन ही कोणतीही सुधारणा झाल्याचे दिसत नाही. उलट खडी पसरवून जवळपास १५ ते २० दिवस उलटूनही परिस्थिती जैशी थे असल्याचे दिसते. यामुळे याचा त्रास येथील रहिवाशांना व गडप्रेमींना सहन करावा लागत आहे. यामुळे अनेक मोटारसायकल स्वार पडून त्यांना मार लागला आहे.

याबाबत बोकडविरा येथील सिडको कार्यालयातील संबंधित अधिकारी वर्गाची भेट घेऊन याची विचारणा केली असता त्यांनी ठेकेदाराला डांबर मिळत नसल्यामुळे कामास विलंब होत असल्याचे सांगितले. तसेच द्रोणागिरी किल्ल्यावर दरवर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. येत्या १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. त्यापूर्वी डांबरीकरण करण्याची मागणी करूनही आज परिस्थिती जैशी थे आहे. यामुळे शिवप्रेमींत नाराजीचा सूर निघत आहे.
याबाबत वरिष्ठ अधिकारी मुंडे यांना मोबाईलवर संपर्क साधून याची पूर्वकल्पना देऊनही काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे सांगितल्यावर आपण चौकशी करू असे सांगत काम लवकर करू असे सांगितले आहे. तसेच ठेकेदारानेही कामास विलंब झाला असूून शिवजयंती नंतर काम पूर्ण करू व काम दिलेल्या नियमानुसार असल्याचे सांगितले.

द्रोणागिरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी केली जाणार आहे. त्यावेळी येणाऱ्या शिवप्रेमींना याचा नाहक त्रास सहन करावा लागणार असल्याने शिवप्रेमींत नाराजीचा सूर आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.