सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू ।
फेब्रुवारी महिन्यापासून मुंबईमधील भिकार्यांविरुद्ध पोलिसांकडून भिक्षेकरी पकड मोहीम राबविण्यास सुरुवात झाली असून भिकार्यांना पकडून त्यांना चेंबुर येथील भिक्षेकरी स्वीकार केंद्रात ठेवण्यात येत आहे. उरणमध्येही भिकार्यांचा मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याने उरण पोलीस आता ही मोहीम कधी राबवतात याकडे उरणकरांचे लक्ष लागले आहे.
भीक मागणे हा कायद्याने गुन्हा असून या कायद्याचे पालन मुंबई पोलीस आता काटेकोरपणे करणार आहेत. मुंबईमध्ये दिवसेंदिवस भिक्षेकरांची संख्या वाढत आहे आणि यामध्ये या वाईट परिस्थितीला आपला व्यवसाय बनवणार्यांची संख्या जास्त आहे. पोलीस सहआयुक्त विश्वासराव नांगरे पाटील यांनी दिलेल्या आदेशामुळे या मोहिमेला सुरुवात झाली आहे.
मुंबईतील पहिली कारवाई आझाद मैदान पोलीस ठाण्याच्या पथकाकडून करण्यात आली. आझाद मैदान पथकाने त्यांच्या हद्दीतील 14 भिक्षेकर्यांना ताब्यात घेऊन त्यांची कोविड चाचणी करून त्यांना चेंबूर येथील भिक्षेकरी स्वीकार गृहामध्ये पाठविण्यात आले.
भीक मागण्यासाठी विशेष करून लहान मुलांचा वापर केला जातो. काही वेळेला मुले चोरून त्यांना भीक मागायला प्रवृत्त केले जाते. लोकांची सहानुभूती मिळवून जास्त पैसे मिळावे म्हणून नुकतच जन्मलेल्या बाळाला हे लोक उपाशी ठेवतात, ते बाळ सतत रडत राहावे, म्हणून त्याला नाहक त्रास देतात. त्या बाळाची पिळवणूक होत असते. काही लोकांसाठी भीक मागणे हा व्यवसाय बनला आहे. दिव्यांग असल्याचे नाटक करून किंवा एखादा गंभीर आजार असल्याचे खोट सांगून लोकांकडून पैसे घेतले जातात. पैसे कमवण्यासाठीचा हा सर्वांत सोयीस्कर मार्ग काहींसाठी झाला आहे. त्याला आळा घालण्यासाठी मुंबई पोलिस सज्ज झाले आहेत.
उरणमध्ये ही मोठ्या प्रमाणात लहान मुलांचा वापर करून भीक मागितली जाताना दिसते. दिव्यांग असल्याचे नाटक करून किंवा एखादा गंभीर आजार असल्याचे खोट सांगून लोकांकडून पैसे घेतले जातात. याशिवाय गावाहून आलो आहोत पैसे संपले नातेवाइक भेटले नाहीत म्हणून ही एसटी स्टँड आणि बाजारात महिला व पुरुष पैसे मागताना दिसतात. त्यांना तिकीट काढून देतो म्हटल्यास नको म्हणतात पैसे द्या म्हणतात. उरण पोलिसांनी ही याविरुध्द आता कारवाई करण्याची गरज आहे.







Be First to Comment