Press "Enter" to skip to content

‘सीएसआर’मधील उल्लेखनीय कार्यासाठी अमेरिकेतील लाईव्ह वीक ग्रुपतर्फे सन्मान

सुदर्शन केमिकल्सचा ‘इंडिया महात्मा अवॉर्ड्स-२०२०’ने सन्मान

सिटी बेल लाइव्ह । धाटाव । शशिकांत मोरे ।

केमिकल्स इंडस्ट्रीज लिमिटेडला अमेरिकेच्या लाईव्ह वीक ग्रुपतर्फे सामाजिक बांधिलकी उपक्रमातील (सीएसआर) उल्लेखनीय कार्यासाठी ‘इंडिया महात्मा अवॉर्ड्स २०२०’ने सन्मानित करण्यात आले. नुकताच नवी दिल्ली येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला.

यावेळी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, जिंदल स्टील अँड पॉवर लिमिटेड फाउंडेशनच्या अध्यक्षा शालू जिंदल, लाईव्ह वीक ग्रुपचे अमित सचदेव यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सुदर्शन केमिकल्सच्या ‘सीएसआर’ विभागाच्या व्यवस्थापक माधुरी सणस आणि समन्वयक रुपेश मारबते यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

महात्मा पुरस्कार उद्योजक आणि समाजसेवक अमित सचदेव यांनी सुरु केलेला असून, त्यांना भारतातील कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचे (सीएसआर) जनक म्हटले जाते. लाईव्ह वीक ग्रुप ही जागतिक दर्जाची संस्था असून, सामाजिक शाश्वत विकासासाठी ती कार्यरत आहे. जगभरात ज्या व्यक्ती व संस्था समाजासाठी महत्वपूर्ण व भरीव कामगिरी करतात त्यांच्या कामाची जागतिक स्तरावर ओळख व्हावी, यासाठी हा ‘इंडिया महात्मा पुरस्कार’ दिला जातो.

माधुरी सणस म्हणाल्या, “व्यवस्थापकीय संचालक राजेश राठी आणि सीएसआर हेड शिवालिका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुदर्शन केमिकल्सने सामाजिक बांधिलकी उपक्रमाद्वारे प्रामाणिकपणा, नैतिकता, नागरी व सामाजिक जबाबदारी या मापदंडांच्या आधारे कार्य केले आहे. त्याचीच दाखल घेऊन हा पुरस्कार मिळाला, याचा आनंद वाटतो. शिक्षण, पर्यावरण आणि सामाजिक विकास क्षेत्रात ‘सुदर्शन’ने भरीव काम केले आहे. लाखो झाडांची लागवड, संगोपन, कचरा व्यवस्थापन, प्रदूषण नियंत्रण यावर भर दिला आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, युवकांना प्रशिक्षण, रोजगार, सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रमासाठी बहुउद्देशीय केंद्र उभारणी, शिवणकाम प्रशिक्षण व शिलाई मशीन वाटप, कागदी पिशवी प्रकल्प राबविण्यासह बस स्टॉप, निवारा आदी सोयी उपलब्ध केल्या आहेत. ‘सीएसआर’अंतर्गत १३ गावात आदर्श गाव प्रकल्प राबवला असून, त्यातल्या तीन गावांना राज्य सरकारकडून संत गाडगेबाबा निर्मलग्राम पुरस्कार मिळाला आहे.”

“रायगडमधील रोहा, महाड आणि मुळशीतील सुतारवाडी येथे कचरा व्यवस्थापन प्रकल्प हाती घेतला आहे. त्यात पाच हजार कुटुंब जोडलेली आहेत. महिला सक्षमीकरण अंतर्गत सात वर्षांपासून कागदी पिशवी बनवण्याचे काम होत असून, ३०० महिला यावर काम करीत आहेत. सात राज्यात या पिशव्यांचा पुरवठा करण्यात येतो. आजवर चार कोटी कागदी पिशव्यांची निर्मिती केली आहे. प्लास्टिक पिशवीला पर्याय असलेल्या कागदी पिशवी बनविण्यासाठी कच्चा माल व प्रशिक्षण सुदर्शन केमिकल्स देते. २०० महिलांना शिवणकाम प्रशिक्षण दिले. या महिला पुण्यात विविध ठिकाणी स्वतंत्र व्यवसाय करत आहेत. अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळांना आयएसओ नामांकन मिळाले आहे. तरुणांसाठी कौशल्य विकास अंतर्गत एलईडी दिवे बनविण्याचे केंद्र उभारले आहे. त्यालाही आयएसओ नामांकन आहे. आदिवासी कुटुंबांकरिता संगीत केंद्र, शेळीपालन, मत्स्यव्यवसाय सुरू केले आहेत. शुद्ध पाणी पुरवठा व्हावा, यासाठी गावांमध्ये एक्वा प्लांट, विहीर बांधकाम यासह गाव, शाळांमध्ये सुशोभीकरण करण्यात आले आहे,” असेही माधुरी सणस यांनी नमूद केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.