Press "Enter" to skip to content

महिलांनी आत्मनिर्भर व्हावे – अश्विनी मते

अ.म.स्वकुळ साळी समाज संस्था व महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने
महिलांना घरघंटी व शिलाई मशीन वाटप सोहळा उत्साहात

सिटी बेल लाइव्ह । महाड । रघुनाथ भागवत ।

स्त्री ही सर्व शोधाची जननी आहे. त्यामुळे स्त्रियांनी स्वतःला कमजोर समजू नये. महिला ह्या अबला आहेत हा कलंक पुसून आम्ही सबला आहोत ही ताकद निर्माण करण्याची वेळ आली आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी आम्हाला शिक्षणाचे बाळकडू पाजले आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना संविधानाच्या माध्यमातून सर्व अधिकार प्राप्त करून दिले आहे. देशात मोठ्या प्रमाणात महिलांनी विविध क्षेत्रात प्रगती केली आहे. स्त्रिया मोठे पद भूषवित आहेत, तर उद्योगाच्या बाबतीत ही महिलांनी प्रगतीचे पाऊल उचलले आहे. स्त्रियांनी कुठलाही अन्याय सहन न करता तेवढ्याच ताकतीने अन्यायाचा प्रतिकार करावा व आत्मनिर्भर व्हावे असे आवाहन महिला मंडळाच्या अध्यक्षा अश्विनी मते यांनी केले.

अखिल महाराष्ट्र स्वकुळ साळी समाज संस्था व महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सबलीकरण उपकरणे वाटप कार्यक्रम रविवारी मोठ्या उत्साहात कालिदास नाट्यगृह मुलुंड येथे संपन्न झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

कार्यक्रमाची प्रस्तावना समाजभगीनी कल्पना शिपूरकर यांनी सुंदरप्रकारे मांडली. यावेळी व्यासपीठावर मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य युवा नेते निखिल जाधव, प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे, प्रकाश पोळ, युवानेते विक्रम पाठक, इचलकरंजी शिखर संस्थेचे उपाध्यक्ष बडे, प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉ. दोशी,डॉ. शहा, समाज लेखिका गीता हरवंदे, शिखर संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अशोक दांडेकर, ज्येष्ठ समाजसेवक भरत मते, विभागीय अध्यक्ष भास्कर चौधरी, पंढरपूर मठाचे सचिव राजेंद्र शेंद्रे, महाराष्ट्र शिखर संस्थेचे सदस्य पदाधिकारी, पुणे साळी समाज मर्ढेकर, जालिंदर इत्यादी मान्यवर, पदाधिकारी आदी उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी आयोजित केलेल्या अभिनव कार्याबद्दल समाधान व्यक्त करून महिलांना आत्मनिर्भर करण्याच्या संकल्पनेबद्दल संस्थेची स्तुती करून आणखी काही मदत लागल्यास ती दिली जाईल असे आश्वासन देखील यावेळी दिले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाड येथील श्रीमती शीतल दुर्गुले, भांडुप येथील संतोषी दांडेकर, अंबरनाथ येथील शितल हरवंदे, ठाणे येथील सुमिता दांडेकर, मुंबई शिवडी येथील अंजना साळी, डोंबिवली येथील मनिषा दांडेकर, मालाड येथील नम्रता डोईफोडे या महिलांना शिलाई मशीन तर कल्याण येथील नेहा वाऊळ आणि बदलापूर येथील सुषमा कोळेकर यांना घरघंटीचे वाटप करण्यात आले. यावेळी हळदी कुंकूचा ही कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यामुळे महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रतिक्षा बोर्डे व मेघना कांबळी यांनी अत्यंत सुंदर प्रकारे केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी अखिल महाराष्ट्र स्वकुळ साळी समाज अध्यक्ष डॉ. अशोक दांडेकर, अश्विनी मते, भरत मते, ज्येष्ठ समाजबांधव चंद्रकांत हावरे, अजित साळी, रायगड जिल्हा स्वकुळ साळी समाज अध्यक्ष अविनाश साळी, संतोष आंबुर्ले, विजय वैद्य, भालचंद्र साळी, कल्पना शिपूरकर यांनी विशेष मेहनत घेतली, तर रायगड जिल्हा महिला मंडळाच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी उत्कृष्ट काम पाहीले. संस्थेचे सचिव भालचंद्र साळी यांनी आभार प्रदर्शन केले, तर कार्यक्रमाची समाप्ती पसायदानाने करण्यात आली. गेली दहा महिन्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकही कार्यक्रम पार न पडल्यामुळे या कार्यक्रमाला उपस्थितांमध्ये मोठा उत्साह पहायला मिळाला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.