सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।
कर्जत नगर परिषद हद्दीत पाणी पुरवठा करणा-या मुख्य जलवाहिनीवर गळती झाल्याने मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचे काम दोन दिवस सुरू आहे, या कामाची पाहणी नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी केली.
कर्जत नगर परिषदेची पाणी पुरवठा योजना पेज नदीवरून करण्यात आली आहे,तालुक्यातील वंजारवाडी येथून वाहणाऱ्या पेज नदीवरून पाणी पंप केले जाते, हे पाणी दहीवली येथे उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. वंजारवाडी ते दहीवली जलशुद्धीकरण केंद्रा पर्यत 12 किलोमीटर अंतराची मुख्य जलवाहिनी टाकण्यात आली आहे, या मुख्य जलवाहिनीवर चार ठिकाणी गळती होती, त्यामुळे पाणी वाया जात होते तसेच गळती मुळे पाण्याला प्रेशर मिळत नव्हते.
गळती काढण्याचे काम एक वर्षा पूर्वीच होणार होते मात्र कोरोना महामारी मुळे लॉक डाऊन झाला त्यामुळे हे काम रखडले होते, अखेर शुक्रवार दि. 29 जानेवारी व शनिवार दि. 30 जानेवारी 2021 या दोन दिवशी मुख्य जलवाहिनी दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि कर्जत नगरपरिषद हद्दीतील पाणीपुरवठा दोन दिवस बंद राहील नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करून दुरुस्तीचे काम सुरू केले.

दुरुस्तीचे काम सुरू असलेल्या ठिकाणी नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील आणि पाणी पुरवठा सभापती बळवंत घुमरे यांनी भेट देऊन कामाची पाहणी केली. काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना काही अडचण आहे का याची चौकशी केली.
पाणी पुरवठा विभागाचे अभियंता अशोक भालेराव, कर्मचारी विलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दुरुस्तीचे काम सुरू आहे त्या कर्मचारी आणि कामगारांचे नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी कौतुक केले. युद्ध पातळीवर सुरू असलेले काम पाहून नगरपरिषद हद्दीतील नागरिकांची होणारी गैरसोय दूर होऊन दोन दिवसा नंतर पुन्हा सुरळीत पाणी पुरवठा होवू शकतो अशी आशा त्यांनी व्यक्त केली.








Be First to Comment