सिटी बेल लाइव्ह । मुकुंद रांजाणे । माथेरान ।
नेहमीच काहीतरी नवनवीन करण्यासाठी धडपड करत असताना इथली वनराई कायमस्वरूपी अबाधीत राहावी यासाठी नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत या जनतेला वारंवार सूचना करीत असतात. आणि स्वतःही त्याप्रमाणे आपले आचरण ठेवत आहेत.
झाडे जगली तरच इथले पर्यटन विकसित होऊ शकते अन्यथा इथे कुणीही फिरकणार सुध्दा नाही त्यासाठी प्रत्येकाने एकतरी रोप लावुन त्याची आपल्या मुलाप्रमाणे जोपासना केल्यास माथेरानला आगामी काळ अत्यंत सुरेख असणार आहे. ह्याच वनराईच्या शीतल गारव्यामुळे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी गर्द झाडी आहे.
दरवर्षी पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे मोठया प्रमाणावर जुनाट झाडे उन्मळून पडत आहेत त्यामुळे सध्यातरी पावसाळ्यात सुध्दा पाहिजे त्या प्रमाणात हवेत गारवा उरलेला नाही. पूर्वीचे आणि आताचे माथेरान ह्यात खूपच तफावत दिसून येत आहे. यासाठी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी मागील चार वर्षांपासून वृक्षारोपण कार्यक्रमावर भर दिला असून नगरपरिषदेच्या माध्यमातून अथवा वनखात्याच्या सोबतीने विविध ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम राबविले आहेत.
यातील बहुतांश रोपे वाढत असून पुढील काळात निश्चितच पुन्हा एकदा हरित माथेरान पहावयास मिळणार आहे.
नुकताच येथील नौरोजी उद्यानात मकरसंक्रांतीचे औचित्य साधून त्यांनी गटनेते तथा बांधकाम सभापती प्रसाद सावंत यांच्या सोबत पिंपळ आणि कडुनिंबाची काही रोपे लावली आहेत. पिंपळ वृक्ष बाराही महिने चोवीस तास ऑक्सिजन पुरवठा करीत असतो त्यामुळे ईथल्या राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मंडळींनी सुध्दा या पिंपळाच्या वृक्षाप्रमाणे चोवीस तास सकारात्मक विचार आणि भौतिक घडामोडी मध्ये विकासात्मक कार्यात नेहमीच दूरदृष्टीने आणि कुठल्याही प्रकारचा मनात आकस अथवा तिरस्काराची भावना न ठेवता गावाच्या आणि आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी सर्वतोपरी चाणाक्षपणा अंगी बानावा असाच संदेश पिंपळाच्या रोपाच्या माध्यमातून दिला आहे तर कडुलिंब हे जरी कडवट असले तरी त्याचा उपयोग नेहमीच आपल्यातील दोष दूर करण्यासाठी, विविध व्याधींवर उपयुक्त असते अर्थातच कडू औषध पण गुणकारी त्याप्रमाणे प्रत्येकाने आपल्या मनातील मळभ, द्वेष, दुराग्रह, मनातील कटुता दूर सारून कुणाच्याही माध्यमातून गावाचा विकास साधताना जे कुविचार आहेत, जळकट वृत्ती,दृष्टी आहे त्याला अंतःकरणात तिलांजली देऊन पुढील वाटचाली साठी जोमाने सुरुवात केल्यास नक्कीच कडुलिंबाच्या रोपाप्रमाणे आपल्या विचारांचा गावाच्या भल्यासाठी नक्कीच फायदा होऊ शकतो हेच या वृक्षारोपणा मधून एकतेचा संदेश दिला जात आहे.








Be First to Comment