Press "Enter" to skip to content

बीडची कन्या पूजा मोरे थेट दिल्लीत दाखल

….तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्याची ही मुलगी सर्वात आधी गोळी झेलेल : दिल्लीत महाराष्ट्राचा आवाज दुमदुमला

तमाम शेतकऱ्यांना व्यासपीठावरून घातला साष्टांग दंडवत !

सिटी बेल लाइव्ह । नवी दिल्ली ।

“शेतकरी आंदोलनादरम्या गोळी झेलण्याची वेळ आळी तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्याची ही मुलगी सर्वात आधी गोळी झेलेल”, असा एल्गार महाराष्ट्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा प्रदेशाध्यक्षा पूजा मोरे यांनी केला. दिल्लीच्या सीमेवर पंजाब आणि हरियाणाचे हजारो शेतकरी आंदोलनाला बसले आहेत. गेल्या 12 दिवसांपासून त्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्राच्या कन्या आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे थेट आंदोलन स्थळी पोहोचल्या. गेल्या पाच दिवसांपासून त्या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. त्यांनी मंचावर जावून तडफदार भाषण करुन आंदोलक शेतकऱ्यांची मने जिंकली

“पंजाब, हरियाणाचे शेतकरी आमचे भाऊ आहेत. मी सगळ्यांना नमस्कार करते. पक्षवाल्यांनी आपल्याला सगळ्यांना हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई अशा जातींमध्ये वाटून दिलं होतं. मात्र, या आंदोलनाने दाखवून दिलं न आम्ही हिंदू आहोत, न मुसलमान आहोत, न सीख आहोत, न ईसाई आहोत. आम्ही शेतकरी आहोत. या देशाचे शेतकरी आहोत”, असं पूजा म्हणाल्या.

“आज भारत बंदची हाक झाली. आमच्या महाराष्ट्राने भारत बंदला सर्वाधिक प्रतिसाद दिला. त्यामुळे मी माझ्या महाराष्ट्राच्या बांधवाना सांष्टांग दंडवत करते. शेतकऱ्याची मुलगी असल्याच्या नात्याने मी या आंदोलनाला समर्थन करते. मलादेखील तुमच्या खांद्याला खांदा लावून लढायचं आहे. आज मी एकटी नाही. माझ्यासोबत माझ्या अनेक माता-बघीणी आहेत”, असा विश्वास पूजा यांनी व्यक्त केला.

“तुम्ही पंजाब-हरियाणाचे शेतकरी एकटे नाही आहात. उद्या जर मोदी सरकारने निकाल नाही दिला तर महाराष्ट्राचे सर्व शेतकरी तुमच्यासोबत येऊन तुमच्या खांद्याला खांदा लावून लढतील. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देशाच्या संसदवर फक्त तुमचा अधिकार नाही. आम्हीदेखील आहोत. देशाचे शेतकरी आज त्रस्त आहेत”, असं त्या म्हणाली.

“हम किसान जीने से परेशान, दिल्ली के उस लाल किले के हमी भी है हकदार, संसद आणि लाल किल्ल्यावर माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलीचादेखील अधिकार आहे. मी लढणार आणि जिंकणार. आम्ही खाली हात वापस जाणार नाहीत. आमच्या महाराष्ट्राहून लाखो शेतकरी दिल्लीत दाखल होत आहेत”, असंदेखील पूजा मोरे म्हणाल्या.

पूजा मोरे कोण आहेत ?


पूजा मोरे या शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांनी याआधी मराठा क्रांती मोर्चामध्ये काम केलं आहे. त्यांनी मुंबई येथील मराठा मोर्चाचे प्रतिनिधित्व करत भाषण केले होते. त्यांना राजकीय वारसा नसताना त्या 2017 साली राज्यातील सर्वात कमी वयाच्या पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. नंतर त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला.

पूजा यांना राज्य पातळीवर शेतकऱ्यांसाठी काम करण्याची संधी मिळाली. त्या गेल्या 3 वर्षांपासून शेतकरी प्रश्नांसाठी आवाज उठवत आहेत. त्यांनी पीकविमा आणि कर्जमुक्तीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रेला सर्वात आधी विरोध करत “CM GO BACK” चा नारा दिला होता. त्यावेळी पोलिसांकडून त्यांची मुस्कटदाबी झाली. पण त्याचे पडसाद महाराष्ट्रभर पडले. आज त्या 5 दिवसापासून दिल्लीतील आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. तिथे त्या महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीमधून पुढे येत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.