हिवाळ्यातील येणारी कोरोनाची दुसरी लाट हृदयविकार रुग्णांसाठी धोकादायक – डॉ संजय तारळेकर 🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । मुंबई । 🔷🔶🔷
कोरोनाचं संकट संपायचं नाव घेत नाहीये. अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसच्या साथीने थैमान घातलं आहे पण जिथे कोरोनाची साथ आटोक्यात आली आहे त्या देशांनाही आता संसर्गाच्या दुसऱ्या लाटेची भीती आहे. महाराष्ट्रात कोरोना नियंत्रणात येत आहे, मात्र गाफिल राहून चालणार नाही. दिवाळीतील गर्दी आणि हिवाळ्यातील थंडीची तिव्रता वाढली तर कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये पुन्हा वेगाने वाढ होईल, असा दावा वैद्यकीय तज्ज्ञांनी केला आहे. जर दुसरी लाट आली तर याचा सर्वात जास्त धोका हृदयविकार रुग्णांना असल्याची माहिती वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
याविषयी अधिक माहिती देताना शुश्रूषा हार्ट केयर सेन्टर व मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व हृदयशल्यविशारद डॉ. संजय तारळेकर सांगतात, ” हिवाळा म्हणजे सर्दी आणि तापाचा ऋतू असे समजले जाते, कोरोनाचा संसर्ग झाल्यावर सुद्धा ताप व सर्दी होते त्यामुळे नागरिकांमध्ये थोडेसे संभ्रमाचे वातावरण निर्माण होणार आहे म्हणूनच हिवाळ्यामध्ये नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. गेल्या वीस वर्षांचा वैद्यकीय आलेख सांगतो की हिवाळ्यामध्ये हृदयविकार रुग्णांचे प्रमाण वाढीस लागते त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने भाकित केलेली कोरोनाची येणारी दुसरी लाट व हिवाळा यावेळी हृदयविकार असणाऱ्या रुग्णांची परीक्षा पाहणार आहे परंतु मानसिक दडपण न ठेवता आहार विहार व आचार या त्रिसूत्रीचा योग्यरीत्या अवलंब केल्यास हृदयविकार असलेले नागरिक तंदुरुस्त राहू शकतात.
हिवाळ्यामध्ये अति मद्यप्राशन व धूम्रपान टाळा कारण अति मद्य व धूम्रपानामुळे हृदयाचे ठोके अनियमित होणे, धडधड वाढणे, चक्कर येणे किंवा छातीत दुखणे अशी लक्षणे दिसतात. थंडीचा जोर वाढल्यावर स्वत:ला उबदार ठेवण्यासाठी गरम कपडे घाला. हृदयविकार अथवा उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तीनी हिवाळ्यात अति शारीरिक श्रम टाळा.ज्या नागरिकांची हृदयशल्यचिकित्सा झाली असेल अथवा ज्या नागरिकांना हृदयविकाराचा त्रास सुरु झाला असेल त्यांनी हृदयाच्या आवश्यक त्या सर्व तपासण्या करून हृदय निरोगी असल्याची खातरजमा करून घ्या.
शरीर फिट राहण्यासाठी आहारासोबत नियमित चालणे तितकंच गरजेचं आहे. चालण्याच्या व्यायामामुळे शरीरामध्ये उष्णता निर्माण होते आणि यामुळे रक्तप्रवाह देखील वाढतो. तसंच हिवाळ्यात रक्तातील शर्करा आणि कोलेस्टरॉल नियंत्रणात राहणं आवश्यक आहे. या ऋतूमध्ये आहारात कमी प्रमाणात मिठाचे सेवन करावे. अधिक प्रमाणात मिठाचे सेवन करणं हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक असते.”
संपूर्ण देशात थंडीमध्ये हा विषाणू कसा असेल याविषयी वैद्यकीय निष्कर्ष काढता आलेले नाहीत. कारण कोरोना महामारी भारतामध्ये आल्यानंतर हा पहिला हिवाळा आहे. पावसाळ्यामध्ये सार्वजनिक वाहतूक बंद असल्यामुळे सर्वसामान्यांचे बाहेर जाण्याचे प्रमाण कमी होते, परंतु आता परिस्थिती बदललेली आहे.
महाराष्ट्रात सर्वच बाजारपेठा, भाजी मंडई सुरु झाल्या असून कोरोनाची महामारी गेल्याच्या भ्रमात राहू नये. उच्च रक्तदाब, मधुमेह तसेच हृदयविकार असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घेण्याची आवाहन हृदयशल्यविशारद डॉ. संजय तारळेकर यांनी केले आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर जाताना तोंडावर मास्क लावणे, दोन व्यक्तीमध्ये योग्य अंतर ठेवणे तसेच बाहेरून घरात आल्यावर हात धुणे या सूचना कटाक्षाने पाळण्याचे गरजेचे आहे अशी माहिती शुश्रूषा हार्ट केयर सेन्टर व मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.







Be First to Comment