जनतेचे अतोनात हाल : 9 नोव्हेंबर रोजी सरपंच सुधीर चेरकर यांच्या नेतृत्वात रास्ता रोको 🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह । पाली/रायगड । धम्मशील सावंत । 🔶🔷🔶
अलिबाग रामराज रस्त्याची आजघडीला अत्यंत भयावह दुरावस्था झाली आहे. खड्डे, दगडगोटे, चिखल यामुळे या जीवघेण्या मार्गावरून प्रवास करणे अत्यंत कठीण झाले आहे. सदर रस्त्याचे डांबरीकरण व मजबुतीकरण होऊन मार्ग सुस्थितीत यावा व जनतेचा प्रवास सुखकर व सुरक्षित व्हावा यासाठी 9 नोव्हेंबर रोजी व्यापक स्वरूपाचे रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा वरंडे ग्रामपंचायतीचे सरपंच सुधीर धर्मा चेरकर व ग्रामस्थांनी दिला आहे.
यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जिल्हाधिकारी रायगड, पोलीस अधीक्षक रायगड, सार्वजनिक बांधकाम विभाग रायगड यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी सरपंच सुधीर चेरकर, ऍड मधुकर वाजंत्री,गजानन पाटील, हेमंत पाटील, अरुण भगत, परशुराम पाटील, प्रकाश खडपे, दिलीप वरसोलकर, गिरीश तेलगे, मोहन थळे, जनार्दन भगत, सुभाष वागळे, रमेश पाटील, जयवंत ठाकूर, जनार्दन शेळके, जयवंत तांबडकर, साहिल भगत, प्रीतम भगत, दिलीप पाटील, हिराजी काष्टे, मंगेश घाणेकर, संदेश वावेकर, शार्दूल वाजंत्री, प्रणित पाटील, ऍड: राकेश पाटील, आदींनी जनआंदोलनाची हाक देत सर्वानी सहभागी होण्याचे आवाहन केले.
सदर निवेदनात अलिबाग रामराज मार्गाची दुरावस्था व येथील जनतेची व्यथा पोटतिडकीने मांडली आहे. या आंदोलनाला जन माणसातून जोरदार पाठिंबा मिळत आहे. अलिबाग हे जिल्ह्याचे मुख्यालय असल्याने नागरिकांना हॉस्पिटल , कोर्ट , तहसील कार्यालय , जिल्हा परिषद कार्यालय तसेच इतर सरकारी , निमसरकारी व खाजगी कार्यालयात सतत काही ना काही कामासाठी जावे लागते . अलिबाग रामराज रस्त्याची आज जी दुरावस्ता झाली आहे. या मार्गावरून चारचाकी तर सोडा , दुचाकी चालवणे सुद्धा कठीण झाले आहे . अलिबाग येथे नोकरी धंद्याच्या निमित्ताने रोज अप – डाऊन करणा – यांची स्थिती अगदी केविलवाणी झाली आहे .
कुटुंबाच्या उदर निर्वाहासाठी कोणत्याही विपरीत परिस्थितीत त्यांना रोज नाईलाजास्तव अलिबाग गाठावेच लागते . ब – याच जणांना अत्यंत खराब रस्त्यावरून ये – जा करून मणक्यांचे व कमरेचे विकार सुरु झाले आहेत . अलिबाग – रोहा हा रस्ता नागरिकांची जीवन वाहिनी आहे . नागरिकांना व्यवसाय , नोकरी , शिक्षण , कृषी , कोर्ट कचेरी आणि सरकारी कार्यालयातील कामे इत्यादिसाठी अलिबाग व रोहा या दोन्ही शहरांचा संबंध येतो , मुख्यत्वेकरून अलिबागला रोज अप – डाऊन करणा – या नागरिकांची संख्या मोठ्याप्रमाणात आहे . या रस्त्यावरून दुचाकी , रिक्षा , चारचाकी खाजगी वाहनांबरोबर सरकारी वाहनांची वर्दळ खूप मोठ्याप्रमाणात आहे .
सुमारे पस्तीस ते चाळीस वर्षापूर्वी या रस्त्याचे संपूर्ण डांबरीकरण झाल्याचे समजते . त्या नंतर जेंव्हा जेंव्हा रस्ता खराब झाला तेंव्हा – तेंव्हा हितसंबंध जपणा – या कंत्राटदारांना रस्ता दुरुस्तीची कंत्राटे देऊन रस्त्याची थातूर – मातुर दुरुस्ती करण्याचे काम करण्यात येते . परंतु दुरुस्तीची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची असतात त्याचा परिणाम आज दिसून येत असल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. पर्यायाने गेल्या तीस पस्तीस वर्षात अपेक्षित निकषाप्रमाणे रस्त्याची दुरुस्ती / डागडूजी झाली नसल्याकारणाने रस्ता कित्येक वर्षे नादुरुस्त असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे .
जिल्ह्यातील अनेक ठिकाणचे रस्त्यांचे देखभाल व दुरुस्ती व डांबरीकरण होत असताना या मार्गाला अच्छे दिन कधी येणार असा सवाल संतप्त ग्रामस्त व प्रवाशी वाहनचालक यांनी उपस्थित केला आहे. पावसाळ्यात सदर रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट असते . जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो . प्रवासात होणारी शारीरिक हानी वैद्यकीय उपचारांना आमंत्रण देत असते तसेच ये – जा करणाऱ्या वाहनांची वित्त हानी वाहनचालकांना न परवडणारी असून वाहने निकामी करणारी आहे .

वाहने आणि नागरिकांचे जीवन नष्ट करणारी रस्त्याची अवस्था गेली कित्येक वर्ष जैसे थे आहे. रस्ता दुरुस्ती साठी राजकारण्यांनी बरेच नारळ फोडले पण रस्त्याची दुरुस्ती करण्याची कोणाचीही मानसिकता नव्हती व नाही . अलिबाग रोहा या रस्त्यावरील अलिबाग ते रामराज – सुडकोली या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वैद्यकीय उपचारासाठी ये – जा करणाऱ्या गरोदर महिला , शालेय विद्यार्थी , वयोवृद्ध नागरिक , दिव्यांग व्यक्ती आणि आपत्कालीन वैद्यकीय उपचारासाठी अलिबागकडे धाव घेणाऱ्या नागरिकांची अवस्था फार केविलवाणी व बिकट झालेली आहे . आज पर्यंत येथील जनतेने रस्त्याचे नूतनीकरण होऊन प्रवास सुखकर होईल या आशेने आमदार , खासदार निवडून दिले परंतु निवडून आल्यावर त्यांनी नारळ फोडून नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्याशिवाय काहीच केले नाही .
सर्व आमदार , खासदार , पालकमंत्री तसेच सर्व राजकारणी आपापल्या प्रगतीच्या मागे लागले आहेत . काही राजकारणी या रस्त्यावरून सतत ये – जा करीत असून त्यांना रस्त्यावरील एकही खड्डा दिसून येत नाही हे येथील नागरिकांचे दुर्दैवच असल्याचे निवेदनात म्हटले आहे . आता पाणी डोक्यावरून जाऊ लागले असून येथील नागरीकांचा संयम सुटत चाललेला आहे . संतापलेले नागरिक आपल्या संविधानिक अधिकाराचा वापर करण्याच्या तयारीत आहेत . तरी त्यांच्या संयमाचा बांध फुटला तर त्यांना आवरणे शक्य होणार नाही पर्यायाने या विभागात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही . असे झाले तर यास जिल्हा प्रशासन व संबंधित अधिकारी जबाबदार असतील असा इशारा देण्यात आला आहे.
येथील नागरीकांचा उद्रेक होण्याआधी या रस्त्याचे संपूर्ण नूतनीकरण होणे गरजेचे आहे . नूतनीकरण म्हणजे खडी टाकून थातूर – मातुर तात्पुरते खड्डे भरणे नव्हे याची नोंद घ्यावी . तसेच सदर रस्त्याच्या नुतनीकरणाची सुरुवात अलिबाग – बेलकडे या बाजूने न करता रामराज किंवा वावे येथून करावी व नूतनीकरणाचे काम चालू असताना कामाच्या प्रतीची चौकशी करण्याची जोरदार मागणी सरपंच चेरकर यांनी केली आहे.








Be First to Comment