मुख्यमंत्र्यांचे चौकशी चे आदेश
मुंबई: मुंबईतील वीजपुरवठा जवळपास अडीच तासांपेक्षा अधिक काळाने सुरु झाला आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई परिसरातील वीजपुरवठा हळूहळू सुरु होत आहे. वीजपुरवठा सुरळीत झाल्याने ठप्प झालेली लोकल रेल्वेची वाहतूकही पूर्वपदावर येत तआहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई आणि लगतच्या परिसरातील अनेक भागांतील वीजप्रवाह सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास अचानकपणे खंडित झाला. प्राथमिक माहितीनुसार, लालबाग, परळ, अंधेरी, दादर, ठाणे, वडाळा आणि नवी मुंबई या भागातील लाईट गेली. ग्रीड फेल्युअरमुळे हा बिघाड झाला होता. अचानक लाईट गेल्यामुळे मुंबईतील पश्चिम आणि मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.
अनेक लोक ट्रेन सध्या ट्रॅकवर उभ्या आहेत. याशिवाय, मुंबई परिसरात असणाऱ्या कॉर्पोरेट कार्यालयांमधील कामकाजही लाईट गेल्यामुळे ठप्प झाले. ( Major Power Shutdown in Mumbai)
शस्त्रक्रिया सुरळीत
दरम्यान, मुंबईतील वीजपुरवठा खंडित झाल्याने त्याचा फटका रुग्णालयांना बसला. विजेअभावी महापालिका रुग्णालयातील शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याचं सांगण्यात येत होतं, मात्र मुंबई महापालिकेतील कोणत्याही शस्त्रक्रिया पुढे ढकललेल्या नाहीत, असं स्पष्टीकरण मुंबई महापालिकेने दिलं.
ऊर्जामंत्र्यांचं स्पष्टीकरण
महापारेषणच्या 400 KV कळवा पडघा GIS केंद्रात सर्किट 1 देखभाल-दुरुस्ती सुरू होती. यावेळी सर्व भार सर्किट 2 वर होता. मात्र सर्किट 2 मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई व ठाणे मधील बहुतांश भाग प्रभावित आहे, असं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केलं.
माजी ऊर्जामंत्र्यांचा हल्लाबोल
‘मुंबईत एकाच वेळेस 2 हजार मेगा वॅटचं फेल्युअर होणे, हे महाराष्ट्राला शोभणारं नाही. हा तांत्रिक मुद्दा असला तरीही, झालेलं फेल्युअर वेळेवर अटेंड न केल्यामुळे, मुंबईतील वीजपुरवठा खंडित झाला’, असा हल्लाबोल माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ऊर्जामंत्र्यांशी चर्चा
वीज खंडित झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांच्याशी चर्चा केली. मुंबई तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या. रुग्णालयांना वीज पुरवठा अबाधित राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था सुरळीतपणे सुरू राहावी जेणे करुन अडचण होणार नाही याबाबत त्यांनी महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनाही सूचना दिल्या.
या सर्व काळात वीज पुरवठा खंडित असल्याने इतर काही अपघात होणार नाहीत यादृष्टीने नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल यांनी सतर्क राहावे व तात्काळ मदत करावी असेही त्यांनी मुख्य सचिव आणि मंत्रालय नियंत्रण कक्षास सांगितले. उपनगरीय रेल्वेला याचा फटका बसला असून तिथेही प्रवाशांच्या मदतीला तात्काळ धावून जाण्याबाबत रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधावा असेही त्यांनी निर्देश दिले आहेत
कोणकोणत्या भागात वीज गायब?
- दादर
- लालबाग
- परळ
- प्रभादेवी
- वडाळा
- ठाणे
- नवी मुंबई
- पनवेल
- बोरिवली
- मालाड
- कांदिवली
- पेण
- पनवेल
- उरण
- कर्जत
- खालापूर
कल्याण परिसरात जवळपास 60 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित
कळवा पडघा जिआयएस (GIS) केंद्रातील तांत्रिक बिघाडामुळे कल्याण शहराला टाटा पॉवरकडून वीजपुरवठा होणारे केबी-1 आणि केबी-2 हे दोन फिडर सकाळी 10 वाजून 5 ते 7 मिनिटापासून बंद आहेत. केबी-2 फिडरवरून कल्याण पश्चिमेला वीजपुरवठा होतो. कल्याण पश्चिमेतील वायलेनगर, पारनाका, दुर्गाडी, गांधारी रोड, आधारवाडी परिसरातील जवळपास 50 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला आहे. तर केबी-1 फिडरवरून वीजपुरवठा होणाऱ्या कल्याण पूर्वेतील 90 फूट रोड, टाटा नेतीवली परिसरातील सुमारे 10 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला आहे. या फिडरवरील वीज ग्राहकांना पर्यायी फिडरमार्फत वीजपुरवठा सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु आहे. आतापर्यंत पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक म्हणजेच 35 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा पर्यायी मार्गाने सुरू करण्यात आला आहे. वरील फिडर वगळता इतर सर्व ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत आहे.






Be First to Comment