बहुजन चळवळीची मोठी हानी, मान्यवरांनी वाहिली आदरांजली 🔶🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशिल सावंत) 🌟💠🌟💠
सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा ग्रामपंचायत हद्दीतील घोडपापड आदिवासीवाडी येथील आदिवासी बहुजन चळवळीतील अग्रगण्य नेतृत्व, सामाजिक कार्यकर्ते हरिश्चंद्र रावजी घोगरकर यांचे वयाच्या 65 व्या वर्षी नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने आंबेडकरी बहुजन चळवळीचे मोठे नुकसान झाले असल्याची शोकाकुल प्रतिक्रिया अंत्ययात्रेस उपस्थित मान्यवरांनी दिली.
सम्यक क्रांती विचार मंचचे ते ज्येष्ठ सल्लागार व सक्रीय कार्यकर्ता होते. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वर्षानुवर्ष दूर राहिलेल्या आदिवासी समाजघटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आदिवासीवाड्यापाड्यात लोकशिक्षण व महापुरुषांची क्रांतिकारी वैचारिक चळवळ गतीमान होणेकामी विशेष योगदान दिले.
आदिवासी समाजाच्या विविध प्रश्न व समस्यांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवून समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम केले. अत्यंत प्रेमळ व मनमिळावू स्वभाव असलेले हरिश्चंद्र घोगरकर प्रत्येक सामाजिक कार्यात सहभागी होत असत.बुध्द, कबीर, शिवराय, फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता.
आदिवासी बांधवांचे प्रश्न व समस्या सोडविण्यावर देखील त्यांचा विशेष भर होता. बहुजन महापुरुषांच्या विचारांनी प्रेरीत होउन महापुरुषांचे कार्य व विचार आचरणात आणून पुरोगामी चळवळीला गतीमान करण्यासाठी त्यांनी आजवर दिलेले योगदान वाखाणण्याजोगे असेच आहे.
घोगरकर यांनी परिवर्तनाच्या चळवळीत स्वताला झोकून देऊन सातत्याने काम केले. सत्यशोधक चळवळ व विचारांचा वारसा खर्याअर्थाने पुढे नेण्याचे काम त्यांच्या हातून घडल्याची प्रतिक्रिया सम्यक क्रांती विचार मंचाचे अध्यक्ष मंगेशभाऊ वाघमारे यांनी व्यक्त केली.
बहुजन चळवळीचे काम तळागळात, खेड्यापाड्यात व घराघरात नेत प्रत्येक माणसाच्या मनामनात महापुरुषांच्या विचारांचे बिजारोपन करण्याचे महत्तम असे कार्य केले. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुलगे, मुली , सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.






Be First to Comment