पाली पुलावर आत्महत्या करणाऱ्या माय लेकाचे वाचविले प्राण : पाली पोलिसांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक 🔶🔷🔷🔶
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशिल सावंत)
पोलीस म्हटले की अनेकांच्या मनात भीती असते, मात्र हेच खाकी वर्दीतील पोलीस जेव्हा माणुसकीचे नाते जपतात, तेव्हा अभिमान वाटतो. पाली आंबा नदीवर आत्महत्येच्या विचाराने प्रवृत्त होत जीवन संपवू पाहणाऱ्या एका महिलेला व तिच्या लहानग्या मुलाला पाली पोलिसांच्या सतर्कतेमुळे दि.(30) रविवारी जीवदान मिळाले. पाली पोलिसांच्या या माणुसकीचे व कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पाली येथील आंबा नदीच्या पुलावर एक महिला आपल्या लहान मुलासह पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होती. त्यादरम्यान गस्तीवरील पोहवा/२१७५ मोरे यांनी तिला अटकाव करून तिला आत्महत्या करण्यात थांबवुन तिचे मनपरिवर्तन करून तिला पोलीस ठाण्यात घेऊन आले. व तिचे प्रबोधन करून तिला आवश्यक ते सहकार्य करण्याची हमी दिली.
सौ.नयना बाळू वालेकर, वय 24 वर्ष, तसेच कु. प्रणय बाळू वालेकर, वय 1.5 वर्ष, रा. वावळोली आदिवासी वाडी तालुका सुधागड येथील महिलेने कौटुंबिक वादातून आत्महत्या करण्याचे पाऊल उचलले होते. मात्र पाली पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह. मोरे यांनी वेळीच सतर्कता दाखवून सदर महिलेला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले.
दरम्यान सदर महिलेचे पती, सासू – सासरे व आई वडील यांना पोलीस स्थानकात बोलावून चौकशी अंती योग्य ती कारवाई केली जाईल असे पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी सांगितले.
सुधागड तालुक्यातील प्रत्येक नागरिकांचे रक्षण करणे, त्यांच्या सुरक्षेबाबत दक्ष राहणे या भूमिकेतून पोलीस आपले कर्तव्ये बजावीत आहेत.अशातच आत्महत्या करणाऱ्या महिलेला व तिच्या मुलाला वाचविण्यात पोलीस यशस्वी झाले. नागरिकांनी आपल्याला काही प्रश्न, समस्या भेडसावत असतील, त्रास असेल तर पोलिसांचे मार्गदर्शन व सहकार्य घ्यावे, जनतेच्या सेवेसाठी पोलीस सदैव तत्पर व कटिबद्ध आहेत.
बाळा कुंभार, पोलीस निरीक्षक पाली सुधागड






Be First to Comment