Press "Enter" to skip to content

सुधागडात अवैद्य दारू निर्मिती व विक्रीला ऊत

शेकडो संसार उध्वस्त ,वावे तर्फे आसरे आदिवासीवाडीतील दारू बंद करा : ग्रामस्थांचे पोलीस अधिक्षकांना साकडे 🔷🔶🔶🔷

सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशिल सावंत) 💠🌟💠🌟

सुधागड तालुक्यात अवैद्य दारू निर्मिती व विक्रीला मोठ्या प्रमाणावर ऊत आला आहे. व्यसनात बुडून असंख्य तरुण बरबाद होत आहेत. शेकडो कुटुंबाचे संसार उध्वस्त होत आहेत. अशातच येथील माणगाव बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील वावे तर्फे आसरे आदिवासीवाडीतील दारू कायमची  बंद करा अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली असून ग्रामपंचायतीने यासंदर्भात दारू बंदीचा ठराव घ्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी सरपंचांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

येथील दारूबंदी कायमची बंद होऊन अवैद्य दारू निर्मिती व विक्रीला चाप बसून उत्पादकांवर कडक कारवाई व्हावी यासाठी ग्रामस्तानी पोलीस अधिक्षकांना साकडे घातले आहे. मागणीची जलद पूर्तता न झाल्यास वावे तर्फे आसरे आदिवासीवाडीतील सर्व ग्रामस्त आपल्या लहान थोर, महिला व कबिल्यासह पाली तहसिल कार्यालय व पाली पोलीस स्थानकासमोर ठिय्या आंदोलन करतील असा इशारा आदिवासी बांधवांनी दिला आहे.

सुधागड तालुका हा भौगोलिकदृष्ट्या दुर्गम, घनदाट जंगल, डोंगर, माळरान पठार, वनाछदीत प्रदेशाने व्यापला आहे. अशातच  येथील रानावनात, जंगल भागात मोठ्या प्रमाणावर अवैद्य दारू निर्मिती व विक्रीला ऊत आला आहे. येथील गावठी दारू उत्पादकांच्या डोक्यावर नेमका कुणाचा वरदहस्त आहे, बिना परवाना , अवैद्यरित्या दारू निर्मिती करणाऱ्यांना कायद्याचे भय आहे की नाही असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत. 

व्यसनाच्या आहारी जाऊन येथील शेकडो कुटुंब उध्वस्त होत आहेत.शिवाय अनेकजण दारूच्या नशेत मृत्यूला कवटाळत आपले अमूल्य जीवन  संपवून टाकत आहेत. दारूच्या व्यसनाच्या गर्तेत बुडून आदिवासी बांधवांच्या पिढ्यानपिढ्या बरबाद होत आहेत. नशेत अनेकांचे अपघाती मृत्यू होत आहेत. अनेकजण पाण्यात  वाहून जाऊन मृत्युमुखी पडत आहेत. अशातच व्यसनाधीन लोकांची संख्या वाढून वाद विवाद तंटे, हाणामारी व गुन्हेगारीला चालना मिळत आहे.

एका बाजूला आदिवासी बांधवांची मुले शिक्षणाची कास धरून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत.तर दुसऱ्या बाजूला आदिवासी वाड्यापाड्यातील काही मुले सहज उपलब्द होणाऱ्या गावठी व विषारी दारूच्या आहारी जाऊन आपले भवितव्य बेचिराख करीत आहेत. रोज नशेत थुल होऊन वाईट प्रवृत्तीला कवटाळत आहेत.  कोरोनाच्या महामारीत उदरनिर्वाह कसा करायचा , जगायचे कसे ही आव्हाने असताना मोलमजुरी करून मिळालेले पैसे दारू  साठी खर्च करीत आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. यातून तणावग्रस्त होत आदिवासी बांधव आत्महत्येचा पर्याय देखील अवलंबत आहेत. 

घरातील उरलेसुरलेले धान्य विकून आपली नशा व तलपं भागवत असल्याचे निवेदनकर्त्यांनी म्हटले आहे. या सर्व समस्यांचे मूळ कारण बनलेली दारू कायमची बंद व्हावी यासाठी ग्रामस्थांनी दंड थोपटले आहेत. प्रशासनाने निवेदनाची दखल घ्यावी अन्यथा व्यापक स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा गजानन मुकणे, सीताराम पवार, रमेश जाधव, वनवशा वाघमारे, दत्तू वाघमारे आदींसह ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे. 

सुधागड तालुक्यातील वावे तर्फे आसरे आदिवासीवाडीतील दारू बंद करा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जाळून घेतलेली महिला छायाचित्रात दिसत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.