पाली ग्रामीण रुग्णालय होण्यासंदर्भात पालकमंत्र्यांसोबतची बैठक पुढे ढकलली 🔷🔶🔶🔷
बैठक लावली नाही तर मंत्रालयासमोर निर्वस्त्र आंदोलन करणार- ह.भ.प महेश पोंगडे महाराज 🔶🔷🔷🔶
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशिल सावंत) 💠🌟💠🌟
सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पालीत ग्रामीण रुग्णालय कामाचे भूमिपूजन व नारळ फोडी कार्यक्रम दोन तीनदा पार पडले. मात्र प्रत्येक्ष कामाला सुरुवात न झाल्याने अशा राजकीय उदासीन धोरणाविरोधात सुधागडवासीयांनी संताप व्यक्त केला आहे.
पालीत ग्रामीण रुग्णालय होण्यासाठी सत्यशोधक वारकरी महासंघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश पोंगडे महाराज व इतरांनी स्वातंत्र्यदिनी धरणे आंदोलन छेडले होते. यावेळी रायगड पालकमंत्री अदिती तटकरे यांनी दिनांक 29 व 30 ऑगस्ट रोजी मंत्रालय मुंबई येथे त्यांच्या दालनात संबधीत अधिकारी व पदाधिकारी यांच्यासमवेत बैठक आयोजित करून ग्रामीण रुग्णालय संदर्भातील बाबी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. ही बैठक लावली नाही तर मंत्रालयासमोर निर्वस्त्र आंदोलन करणार असा इशारा पोंगडे महाराज यांनी दिला आहे.
महाड मधील इमारत दुर्घटना आणि 29 व 30 तारखेला असणारी सुट्टी तसेच 1 तारखेला गणेश विसर्जन यामुळे बैठक पुढे ढकलली असून ही बैठक बुधवारी (दि.2) सप्टेंबर नंतर होणार आहे. याबाबत जिल्हा परिषद सदस्य सुरेश खैरे यांनी ह.भ. प. महेश पोंगडे महाराज यांना कळविले. दरम्यान या ग्रामीण रुग्णालयाच्या आंदोलनात केवळ महेश पोंगडे महाराज सहभागी नसून सुधागडवासीय जनतेसह विविध सामाजिक संघटना, सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांनी सहभाग व पाठिंबा दर्शविल्याने या प्रश्नाकडे आता सरकारला गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.
सुधागडात आरोग्य सेवा सुविधांचे तीनतेरा वाजलेत,वेळीच उपचार न मिळाल्याने गर्भवती महिला, वृद्ध, अपघाती जखमी यांना आपले प्राण गमवावे लागले. पालीत ग्रामीण रुग्णालयास मंजुरी मिळाली आहे, मात्र काम रखडले आहे. या प्रश्नावर मंत्रालयात बैठक घेण्याचे आयोजीत केले आहे. 7 तारखेला पावसाळी अधिवेशन आहे. त्या अगोदर बैठक लावली नाही तर मुबंई मध्ये मंत्रालया समोर निर्वस्त्र होऊन निषेध करू.
ह.भ.प. महेश पोंगडे, आंदोलनकर्ते






Be First to Comment