Press "Enter" to skip to content

पिगोंडे ग्रामपंचायतीकडून गणेश विसर्जनासाठी होडीची व्यवस्था

सरपंच संतोषभाई कोळी यांचा अनोखा उपक्रम 🔷🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) 🔷🔶🔶🔷

कोरोना विषाणूच्या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर गणपती बाप्पांच्या विसर्जनासाठी गणेश भक्तांवर अनेक बंधने आल्याने नागोठण्याजवळील पिगोंडे ग्रामपंचायतीकडून गणेश विसर्जनासाठी अंबा नदीत होडीची व्यवस्था करण्यात आली होती. या आगळ्या वेगळ्या विसर्जन सोहळ्यासाठी पिगोंडे ग्रामपंचायतीचे सरपंच संतोषभाई कोळी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.

नागोठण्याजवळील पिगोंडे (ता.रोहा) ग्रामपंचायत हद्दितील वेलशेत व आंबेघर गावांतील गणपती बाप्पांचे अंबा नदीवरील नवीन पुलाखाली पारंपारिक पद्धतीने विसर्जन केले जाते. मात्र यावर्षी कोरोना विषाणूमुळे शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार गणेशोत्सव साजरा करण्याची बंधने गणेश भक्तांवर आली.

त्यामुळेच अनेक नियमांच्या बंधनात नागरिकांना आपल्या लाडक्या बाप्पांच्या आगमनानंतरही गणेशोत्सव काळातील आपल्या हौस मौजवर पाणी सोडावे लागले. त्यातच विसर्जनसलाही शासनाकडून केवळ दोन-तीन व्यक्तींनांच विसर्जन स्थळी प्रवेश असल्याचे जाहीर करण्यात आल्याने पिगोंडे ग्रामपंचायत हद्दितील नागरिकांनी शासनाने व ग्रामपंचायत प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत विसर्जन स्थळी गर्दी करण्याचे टाळले. याचवेळी पिगोंडे ग्रामपंचायतीनेही आपल्या सर्व नागरिकांच्या लाडक्या बाप्पांची व माहेरवासीन गौरी मातेची विसर्जनासाठी कोणत्याही प्रकारे अडचण होऊ नये यासाठी होड्यांची व्यवस्था केली.

पिगोंडे ग्रामपंचायतीने विसर्जनासाठी नेमलेल्या व्यक्तींकडून गणपती बाप्पांना होडीतून नेवून नदीच्या खोल पात्रात त्यांचे विसर्जन करण्यात आले. पिगोंडे ग्रामपंचायतीने बाप्पांच्या विसर्जनासाठी केलेल्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे व सरपंच संतोषभाई कोळी यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.