सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे (नंदकुमार मरवडे) 🔶🔷🔶🔷
रोहे तालुक्यातील श्री क्षेत्र तळवली तर्फे अष्टमी या गावचे प्रतिष्ठित नागरिक व रोहे पं.स.चे सेवानिवृत्त कर्तव्यदक्ष पशूधन विकास अधिकारी तसेच मुक्या पाळीव प्राण्यांवर प्रेम करून त्यांच्यामध्ये देव शोधणारे डॉ. विठोबा धों.मरवडे यांचे एका अल्पशा आजाराने ठाणे येथील एका इस्पितळात उपचारादरम्यान दु:खद निधन झाले.त्यांच्या दु:खद निधनामुळे समस्त मरवडे परिवारासह तळवली गावावर दु:खाचे सावट पसरले असून संपूर्ण रोहे तालुक्यात हळहळ व्यक्त होताना दिसत आहे.
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच समस्त मरवडे परिवार व ग्रामस्थांना शोक अनावर झाला होता.तर त्यांचे एकाकी दु:खद निधन ही विश्वास ठेवण्यासारखी गोष्ट नव्हती.डॉ. विठोबा मरवडे यांनी आपल्या सेवानिवृत्तीपुर्वी रोहे पं.समिती येथे पशूधन विकास अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी कधीही आपल्या अधिकाराचा गैरवापर केला नाही तर आपल्या सेवाकाळात त्यांनी सर्वांशी चांगले सौदाहार्याचे संबंध जोपासले.
अतिशय शांत,विनम्र,परोपकारी व प्रेमळ स्वभावाचे डॉक्टर म्हणून सर्वांना विशेष परिचित होते.पशूधन खात्यात रायगड जिल्ह्यासह जिल्ह्या बाहेरही त्यांनी सेवा करीत असताना केवल माणूसकी जपण्याचेच काम केले.वयोमानापरत्वे सेवानिवृत्त झाल्यानंतर सामाजिक सेवा करण्याच्या उद्देशाने त्यांनी आपले मुक्या पाळीव प्राण्यांची सेवा करण्याचे व्रत पुढे चालूच ठेवले.लाँकडाऊन कालावधीत देखील त्यांनी आपल्या सेवा चालू ठेवली होती. तर माझ्या कौशल्याचा उपयोग गोरगरीब शेतकरी वर्गासाठी होत असल्याने मला मोठे समाधान मिळत असल्याचे ते आवर्जून सांगत असत.
पशूधन खात्यामध्ये सेवा करीत असताना सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी आपला गाव व समाजासाठीही भरीव योगदान दिले. गरीब परिस्थितीतून
शिक्षण घेतल्याने त्यांना परिस्थितीची पूर्ण जाणिव होती.
अडल्या नडलेल्यांना ते नेहमीच सहकार्य करीत.तर वाट चुकलेल्यांनाही नेहमी चांगले मार्गदर्शन करीत.खांब विभागातील नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळाचे श्रमिक विद्यालय चिल्हे या विद्यावयाची स्थापना करण्यातही त्यांचा मोलाचा वाटा होता.समाजात वावरत असताना त्यांनी कधीही आपण कोणीतरी मोठे आहोत या अविर्भावात कधीच वावरले नाहीत.सामाजिक जबाबदारी पार पाडत असताना वेळप्रसंगी आपल्या परिवारालाही आपण पुरेसा वेळ देऊ शकत नसल्याची खंतही ते व्यक्त करीत असत.त्यांच्या एकाकी सोडून जाण्यामुळे समाजाचे फार मोठे नुकसान झाले असून समाज एका चांगल्या व नि:स्वार्थी ,समाजसेवकास मुकला असल्याची प्रतिक्रिया जनमानसात उमटू लागली आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुलगे,सुना,नातवंडे, भाऊ,बहिणी,पुतणे असा मोठा परिवार असून त्यांचे दशक्रियाविधी दि.२ सप्टेंबर तर अंतिम धार्मिकविधी दि.४ सप्टेंबर रोजी तळवली निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.






Be First to Comment