

पेण, दि. 6 (वार्ताहर) : शासनाच्या धोरणानुसार आपली अंगणवाडी, आपली जबाबदारी हे ब्रिद वाक्य घेऊन येथील सेविका, मदतनीस तसेच अशा वर्कर आपापल्या केंद्रांवर काम करत असताना त्यांनाही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.त्यामुळे त्यांच्या कामा इतके मानधन आताच्या घडीला मिळत नसल्याने येणाऱ्या काळात त्यांच्या मानधनात वाढ करण्याचा प्रयत्न आपण करणार असल्याचे सांगत अंगणवाडी शाळा स्मार्ट करण्यावर सुद्धा भर दिला जात असल्याचे रायगड जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
9 वा राष्ट्रीय पोषण माहे 2026 चा कार्यक्रम पेण येथील निसर्ग फार्महाऊस येथे संपन्न झाला.या कार्यक्रमाला महिला व बालकल्याण सभापती रसिका केणी, सभापती वैकुंठ पाटील, जिप सदस्या मानसी दळवी, प्रभाकर म्हात्रे, जनार्दन भस्मा, पल्लवी भोईर, पेण पंचायत समिती सभापती स्मिता पाटील, उपसभापती संजय डंगर, गट विकास अधिकारी गजानन लेंडी, एकात्मिक प्रकल्प अधिकारी रसिका यादव, आदींसह सेविका, मदतनीस, आशा वर्कर मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तर यंदाची मुख्य थीम “आपली अंगणवाडी आपली जबाबदारी”असून अंगणवाडी सेवांचे निरीक्षण आणि लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी पोषण ट्रॅकर हे डिजिटल व्यासपीठ वापरले जात आहे.त्यामुळे या प्रणालीच्या माध्यमातून अंगणवाडी केंद्रांची स्थिती, बालकांची उपस्थिती, पूर्वप्राथमिक शिक्षण उपक्रम आणि बालकांच्या वाढीचे निरीक्षण आदि बाबींवर लक्ष ठेवले जाणार आहे त्यामुळे अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी मुलांचा कसा सांभाळ करावा शिक्षणातून इंग्रजीची ओळख करून द्यावी यासह इतरही उपक्रमातून मुलांना शिकवावे असे महिला व बालकल्याण सभापती रसिका केणी यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.यावेळी उपस्थितांच्या हस्ते सेविका, मदतनीस, आशा वर्कर यांचा सन्मान करण्यात आला.





Be First to Comment