
रसायनी (आनंद पवार) रसायनी परिसरातील प्रिया स्कूल व जनता विद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा व घाणीचे ढीग साचल्याने परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या रस्त्यावरून दररोज ये-जा करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांसह पालक व सर्वसामान्य नागरिकांना दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.या गंभीर समस्येकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
एमआयडीसीच्या अखत्यारित असलेल्या या रस्त्याच्या परिसरात कचरा टाकण्याचे प्रकार वाढले असून, विशेषतःएमआयडीसी कॉलनीतील काही नागरिकांकडून बेजबाबदारपणे कचरा टाकला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा घाणीचे ढीग निर्माण झाले आहेत.शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याच अस्वच्छ वातावरणातून मार्गक्रमण करावे लागत असल्याने पालकवर्गातूनही नाराजी व्यक्त होत आहे.सध्या रसायनी परिसरात विविध आजारांचा धोका वाढलेला असताना परिसरातील अस्वच्छता ही नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने गंभीर बाब ठरत आहे. साचलेला कचरा,दुर्गंधी आणि डासांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे प्रशासनाने केवळ स्वच्छतेच्या घोषणा न करता प्रत्यक्षात कठोर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

कचरा टाकू नये’च्या फलकांखालीच कचऱ्याचे ढीग
वासांबे-मोहोपाडा ग्रामपंचायतीने रोटरी क्लब ऑफ पाताळगंगेच्या माध्यमातून विविध ठिकाणी येथे कचरा टाकू नये,अशा आशयाचे फलक लावले आहेत.मात्र,दुर्दैवाची बाब म्हणजे याच फलकांच्या आसपास मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचलेले दिसत आहेत.त्यामुळे जनजागृतीसाठी लावण्यात आलेल्या फलकांचाही उद्देश निष्फळ ठरत असल्याचे चित्र आहे.एकीकडे केंद्र व राज्य शासनाकडून स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून स्वच्छ आणि सुंदर भारताचा संदेश दिला जात आहे;तर दुसरीकडे रसायनी परिसरातील शाळांकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांवरच कचऱ्याचे ढीग साचत असल्याने या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ नको
प्रिया स्कूल तसेच जनता विद्यालया कडे जाणाऱ्या रस्त्यावर वाढलेली अस्वच्छता ही केवळ सौंदर्याचा प्रश्न नसून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर बाब आहे.त्यामुळे संबंधित प्रशासनाने या ठिकाणी तातडीने कचरा हटवून नियमित स्वच्छता व्यवस्था करावी,कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी तसेच या परिसरात कचरा पुन्हा साचणार नाही यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.प्रशासनाने आता तरी जागे होऊन या समस्येकडे गांभीर्याने पाहावे,अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.



Be First to Comment