Press "Enter" to skip to content

रौप्य महोत्सवी वर्ष दिवाळी अंक स्पर्धेचा मंगळवारी पनवेलमध्ये पारितोषिक वितरण सोहळा ; सांस्कृतिक मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार याच्या हस्ते होणार सन्मान

पनवेल (प्रतिनिधी) दिवाळी अंकांच्या समृद्ध परंपरेला गेली २५ वर्षे प्रोत्साहन देणाऱ्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघाच्या राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धेने यंदा रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले. या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित २५ व्या दिवाळी अंक स्पर्धेचा भव्य पारितोषिक वितरण सोहळा मंगळवारी (दि. ६ ऑक्टोबर) सायंकाळी ४ वाजता पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे. राज्याचे माहिती व तंत्रज्ञान तसेच सांस्कृतिक मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते विजेत्या दिवाळी अंकांना पारितोषिके प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.

      माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या रौप्य महोत्सवी सोहळ्यास ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा सुप्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील आणि प्रसिद्ध चरित्रलेखिका वीणा गवाणकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

     गेल्या २५ वर्षांमध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यभरातील दिवाळी अंकांना प्रोत्साहन देतानाच लेखक, साहित्यिक, संपादक आणि विविध कलावंतांच्या सर्जनशीलतेचा गौरव करण्यात आला आहे. रौप्य महोत्सवी वर्ष हा या प्रदीर्घ साहित्यिक प्रवासातील महत्त्वाचा टप्पा असून, या निमित्ताने यंदाच्या स्पर्धेतील विजेत्यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय स्पर्धेतील विजेत्या अंकाला १ लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक, द्वितीय क्रमांकाला ५० हजार रुपये, तर तृतीय क्रमांकाच्या अंकाला ३० हजार रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे. तसेच विविध साहित्यिक व कलात्मक विभागांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दिवाळी अंकांसह लेखकांचाही गौरव करण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यातील दिवाळी अंकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धेतील विजेत्यांना ४० हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक, २० हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक आणि १० हजार रुपयांचे तृतीय पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय विविध साहित्यिक व कलात्मक विभागांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अंकांचा आणि लेखकांचा सन्मान करण्यात येणार आहे.

      रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने होत असलेला हा पारितोषिक वितरण सोहळा दिवाळी अंकांच्या २५ वर्षांच्या साहित्यिक प्रवासाचा गौरव ठरणार आहे. मराठी साहित्य, कला, संस्कृती आणि वैचारिक परंपरेला समृद्ध करणाऱ्या दिवाळी अंकांच्या योगदानाचा सन्मान या सोहळ्यात करण्यात येणार असल्याने साहित्यप्रेमी, लेखक, पत्रकार, संपादक आणि दिवाळी अंक रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, सचिव परेश ठाकूर, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, कार्यवाह शैलेंद्र शिर्के आणि स्पर्धा समन्वयक दीपक म्हात्रे यांनी केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.