
पनवेल (प्रतिनिधी) सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध समाजोपयोगी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २५ व्या राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मंगळवार दिनांक ०६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ०४ वाजता पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे. या वेळी राज्याचे माहिती व तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक मंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते विजेत्या दिवाळी अंकांना पारितोषिके प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्यास प्रमुख मान्यवर म्हणून ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील, प्रसिद्ध चरित्रलेखिका वीणा गवाणकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दिवाळी अंकांच्या परंपरेला प्रोत्साहित करणार्या या स्पर्धेतील विजेत्यांना लाखो रुपयांची पारितोषिके देऊन त्यांच्या सर्जनशीलतेचा सन्मान केला जात असून या सोहळ्याचा साहित्यप्रेमी, लेखक, पत्रकार, संपादक आणि दिवाळी अंक रसिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, सचिव परेश ठाकूर, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, कार्यवाह शैलेंद्र शिर्के आणि स्पर्धा समन्वयक दीपक म्हात्रे यांनी केले आहे.


Be First to Comment