

सामाजिक समतेचा संदेश देत विविध कार्यक्रमांनी रंगला जयंती महोत्सव; सुधीर सोनावळे व राष्ट्रीय प्रबोधनकार पवन दवंडे यांच्या प्रबोधनाने उपस्थित भारावले
रसायनी (आनंद पवार)
साहित्यरत्न, लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त रविवार दि.३०ऑगस्ट रोजी रसायनी-पाताळगंगा परिसरात उत्साह,जल्लोष आणि सामाजिक प्रबोधनाचा संगम पाहायला मिळाला. साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती,रसायनी-पाताळगंगा परिसर यांच्या संयुक्त विद्यमाने विविध सामाजिक,सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करून अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
जयंतीनिमित्त रसायनी परिसरात सकाळपासूनच विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू होती.मोहोपाडा येथील मुख्य बाजारपेठेत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.त्यानंतर सकाळी ११ वाजता साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले.
दुपारी आयोजित कार्यक्रमात मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनावर, साहित्यिक योगदानावर तसेच सामाजिक परिवर्तनाच्या कार्यावर विचार व्यक्त केले. अण्णाभाऊंनी आपल्या लेखणी, शाहिरी आणि साहित्यातून कष्टकरी,कामगार,शोषित आणि वंचित समाजाच्या व्यथा मांडत सामाजिक समतेचा बुलंद आवाज निर्माण केला, असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले.

सुधीर सोनावळे यांच्या अभ्यासपूर्ण प्रबोधनाने कार्यक्रमाला वेगळी उंची
या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते पनवेल तालुक्यातील चावणे येथील सामाजिक कार्यकर्ते सुधीर सोनावळे यांनी आपल्या ओघवत्या आणि अभ्यासपूर्ण भाषणातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा विस्तृत आढावा घेतला. अण्णाभाऊंचे बालपण,संघर्षमय जीवन, साहित्यनिर्मिती,शाहिरी आणि समाजातील उपेक्षित घटकांसाठी त्यांनी केलेले कार्य याबाबत सोनावळे यांनी उपस्थितांना सविस्तर माहिती दिली.
अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक किंवा लोकशाहीर नव्हते,तर कष्टकरी आणि वंचित समाजाच्या वेदनेला शब्द देणारे परिवर्तनवादी विचारवंत होते,असे सांगत सुधीर सोनावळे यांनी त्यांच्या साहित्यामागील सामाजिक भूमिका उपस्थितांसमोर प्रभावीपणे मांडली. त्यांच्या प्रबोधनातून उपस्थित समाजबांधवांना अण्णाभाऊंच्या विचारांचा आणि सामाजिक बांधिलकीचा नव्याने परिचय झाला.
या कार्यक्रमाला मोहोपाडा ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.उमा संदीप मुंढे, तुराडे ग्रामपंचायतीच्या सौ.रंजना गायकवाड तसेच जिल्हा परिषद सदस्य सौ.अनन्या अविनाश गाताडे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली.
पवन दवंडे यांच्या सप्तखंजिरीच्या तालावर सामाजिक प्रबोधनाचा जागर
जयंती महोत्सवाचा विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला तो राष्ट्रीय प्रबोधनकार व सप्तखंजिरी वादक पवनजी दवंडे यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम.दुपारी ४ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत मोहोपाडा एच.ओ.सी. कॉलनीतील साई मंदिर सभागृहात हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
राष्ट्रीय प्रबोधनकार पवन दवंडे यांनी आपल्या सुमधुर गायनासह सप्तखंजिरीच्या तालावर सामाजिक प्रबोधनाचा प्रभावी जागर घडवून आणला. अण्णाभाऊ साठे यांचे विचार, सामाजिक समता,शिक्षण,संघटन,कष्टकरी समाजाचे प्रश्न आणि सामाजिक परिवर्तनाची गरज यावर त्यांनी आपल्या खास शैलीत भाष्य केले.
त्यांच्या प्रभावी सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.सप्तखंजिरीच्या तालावरून आणि प्रभावी शब्दांतून त्यांनी उपस्थितांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे संपूर्ण सभागृहात उत्साहाचे आणि प्रबोधनाचे वातावरण निर्माण झाले होते.
या कार्यक्रमाला रसायनी-पाताळगंगा परिसरातील समाजबांधव, प्रतिष्ठित नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजबांधवांच्या एकजुटीने जयंती महोत्सव यशस्वी साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव यशस्वी करण्यासाठी कष्टकरी नगर, खानेआंबिवली, तुराडे,मोहोपाडा तसेच रसायनी-पाताळगंगा परिसरातील समाजबांधवांनी विशेष मेहनत घेतली. नियोजन,कार्यक्रमाची तयारी आणि आयोजनासाठी सर्वांनी एकजुटीने परिश्रम घेतल्याने जयंती महोत्सवाला भव्य स्वरूप प्राप्त झाले.अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर करत,सामाजिक समता आणि बंधुभावाचा संदेश देत रसायनी परिसरात साजरा झालेला हा जयंती महोत्सव समाजबांधवांच्या एकजुटीचे आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवणारा ठरला.


Be First to Comment