Press "Enter" to skip to content

रिस येथे १३ वर्षीय मुलाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

शुल्लक कारणातून टोकाचे पाऊल ; परिसरात हळहळ

रसायनी (आनंद पवार)

रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिस येथील महालक्ष्मी रुबी बिल्डिंगमध्ये एका १३ वर्षीय मुलाने राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

प्रज्वल रणजीत पाटील असे मृत मुलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार,प्रज्वल याने घरातील सिलिंग हुकला नायलॉनची दोरी बांधून गळफास घेतला.ही बाब लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी त्याला तातडीने उपचारासाठी मोहोपाडा येथील पल्स हॉस्पिटलमध्ये नेले.तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी रिस येथील निरामय हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तेथून चौक येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.मात्र,तेथील डॉक्टरांनी तपासणी करून प्रज्वलला मृत घोषित केले.

प्रज्वलचे वडील रणजीत पाटील हे पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील वानबेरी कंपनीत नोकरीस आहेत. अवघ्या १३ वर्षांच्या चिमुकल्याने अशाप्रकारे टोकाचे पाऊल उचलल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे.

आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनेची माहिती मिळताच रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव तसेच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.याप्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश बाचकर पुढील तपास करीत आहेत.
अल्पवयीन मुलांनी क्षुल्लक कारणांवरून टोकाचे पाऊल न उचलता पालक, शिक्षक किंवा विश्वासू व्यक्तींशी मनमोकळेपणाने संवाद साधणे गरजेचे आहे.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.