
खोपोली : प्रतिनिधी
खोपोली परिसरातील झेनिथ वॉटर फॉल, केपी वॉटर फॉल आणि इतर नैसर्गिक धबधबे पावसाळ्यात हजारो पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरतात. मुंबई, ठाणे, पुणे आणि राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने पर्यटक येथे येत असल्याने दरवर्षी अपघात आणि बचावकार्याची आव्हानेही वाढत आहेत. सोशल मीडियावरील रील्स, व्हिडिओ आणि छायाचित्रांच्या मोहापायी अनेक पर्यटक धोकादायक ठिकाणी जात असल्याने जीवितहानीच्या घटनाही घडत आहेत.
यंदाच्या पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह वाढल्याने पर्यटक अडकल्याच्या घटना घडल्या त्यात पार पाडलेल्या बचाव मोहीम आणि विशेषतः २ ऑगस्ट रोजी झालेल्या युवा पर्यटकाचा दरीत कोसळून झालेल्या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेने स्थानिक युवकांची भूमिका किती महत्त्वाची आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले. मुसळधार पाऊस, अंधार आणि अत्यंत कठीण परिस्थितीत विहारी झेनिथ ठाकूरवाडीतील युवकांनी हेल्प फाउंडेशन, पोलीस यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून बचावकार्य तसेच खोल दरीतून पर्यटकाचा मृतदेह बाहेर काढण्याच्या मोहिमेत मोलाची भूमिका बजावली.
या धाडसी कार्याची दखल खोपोली पोलीस स्टेशनचे निरीक्षक सचिन हिरे यांनी घेतली असून युवकांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे. याच प्रेरणेतून हेल्प फाउंडेशनने या युवकांच्या धाडसाला संघटित दिशा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
या उपक्रमांतर्गत विहारी झेनिथ ठाकूरवाडी व परिसरातील युवकांना आपत्ती व्यवस्थापन, रेस्क्यू तंत्र, दोरखंडाचा सुरक्षित वापर, प्राथमिक उपचार आणि आपत्कालीन प्रतिसाद यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याचबरोबर रेस्क्यू मोहिमेसाठी आवश्यक सुरक्षा साधने, गणवेश आणि मूलभूत साहित्य उपलब्ध करून देण्याचाही संकल्प करण्यात आला आहे.
या संकल्पाची पहिली पायरी म्हणून हेल्प फाउंडेशनच्या वतीने स्थानिक युवकांना रेस्क्यू ऑपरेशनसाठी आवश्यक प्राथमिक सुरक्षा साहित्याचे वितरण करण्यात आले. हेल्प फाउंडेशनचे सुनील पुरी, सौरभ घरत, योगेश औटी आणि निखिल ढोले यांच्या हस्ते हे साहित्य नारायण निरगुडे, कुमार ढुमने, प्रकाश निरगुडे, राकेश भगत, अक्षय जाधव,सचिन भगत आणि विहारी झेनिथ ठाकूरवाडीतील ग्रामस्थानी स्वीकारले.
हेल्प फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, आपत्ती घडल्यानंतर पोलीस, अग्निशमन दल किंवा इतर शासकीय यंत्रणा घटनास्थळी पोहोचेपर्यंतचा सुरुवातीचा कालावधी अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात प्रशिक्षित स्थानिक युवक सुरक्षित पद्धतीने प्राथमिक बचावकार्य सुरू करू शकले, तर अनेक मौल्यवान जीव वाचू शकतात. याच उद्देशाने युवकांना टप्प्याटप्प्याने अत्याधुनिक प्रशिक्षण आणि अधिक सक्षम रेस्क्यू साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू राहणार आहेत.
विहारी झेनिथ ठाकूरवाडीतील युवकांमध्ये समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द आणि धाडस आहे. त्या ऊर्जेला योग्य दिशा देत प्रशिक्षित, शिस्तबद्ध आणि सुसज्ज स्वयंसेवकांची स्थानिक फळी उभी करणे, हा हेल्प फाउंडेशनच्या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे. भविष्यात पोलीस प्रशासन, महसूल विभाग, खोपोली नगरपालिका, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि स्थानिक युवक यांच्या समन्वयातून उभारला जाणारा हा उपक्रम खोपोली परिसरातील पावसाळी पर्यटन अधिक सुरक्षित करण्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.




Be First to Comment