
पनवेल (प्रतिनिधी) रोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना नामांकित कंपन्या व विविध उद्योगांमध्ये रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी, पनवेल यांच्या वतीने ‘महारोजगार मेळावा २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. हा रोजगार मेळावा शनिवार, दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजता चांगू काना ठाकूर महाविद्यालय, खांदा कॉलनी येथे होणार आहे.
या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून दहावी उत्तीर्ण, बारावी उत्तीर्ण, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर, पदव्युत्तर तसेच विविध कौशल्ये असलेल्या उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विविध नामांकित कंपन्या व उद्योग या मेळाव्यात सहभागी होणार असून, उमेदवारांना थेट रोजगाराच्या संधी मिळण्याबरोबरच जॉब इंटरव्ह्यू, करिअरच्या संधी आणि उत्तम नेटवर्किंग करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. रोजगाराच्या संधींच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी हा मेळावा महत्त्वपूर्ण ठरणार असून, ‘रोजगार शोधणाऱ्यांना सुवर्णसंधी’ या उद्देशाने त्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मेळाव्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक असून, जाहिरातीतील क्यूआर कोड स्कॅन करून किंवा दिलेल्या गुगल फॉर्मच्या माध्यमातून उमेदवार नोंदणी करू शकतात. अधिक माहितीसाठी ७४९८०७४१०५ या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या महारोजगार मेळाव्यात सहभागी होऊन युवकांनी आपल्या भविष्याची दिशा निश्चित करावी आणि उपलब्ध रोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




Be First to Comment