



विद्यार्थ्यांच्या हाती ज्ञानाची शिदोरी, भूमीत हरित भविष्याची बीजे
लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवस निमित्त सेवाभावाचा उत्सव ; कळंबोली शिवसेनेच्या वतीने वृक्षदिंडी वृक्षारोपण आणि शालेय साहित्याचे वाटप
पनवेल (प्रतिनिधी) वाढदिवस म्हणजे केवळ शुभेच्छांचा वर्षाव, पुष्पगुच्छ, बॅनरबाजी आणि जाहिरातींची रेलचेल अशी रूढ झालेली परंपरा बदलण्याचा प्रयत्न कळंबोलीत पाहायला मिळाला. समाजहित, पर्यावरण संवर्धन आणि शिक्षणाला प्राधान्य देत लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ५२ व्या वाढदिवसानिमित्त शिवसेना कळंबोली शहराच्या वतीने वृक्षदिंडी, वृक्षारोपण आणि शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप अशा समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश देण्यात आला.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना पुष्पगुच्छ, होर्डिंग्ज, जाहिराती आणि अनावश्यक खर्च टाळून तो निधी समाजोपयोगी, शैक्षणिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांसाठी खर्च करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला नागरिक, कार्यकर्ते आणि विविध सामाजिक संघटनांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अनेक ठिकाणी विधायक उपक्रम राबविले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आज (मंगळवारी) शिवसेना कळंबोली शहराच्या वतीने नवीन सुधागड हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. अनेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणाऱ्या या उपक्रमातून शिक्षणासाठी आवश्यक साहित्याची मदत करण्यात आली. शिक्षण हीच खरी समाजपरिवर्तनाची ताकद असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

याचवेळी शाळेच्या परिसरातून वृक्षदिंडी काढण्यात आली. विद्यार्थी, शिक्षक आणि पदाधिकाऱ्यांनी ‘झाडे लावा… झाडे जगवा’, ‘पर्यावरण वाचवा, भविष्य घडवा’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. वृक्षदिंडीद्वारे पर्यावरण संवर्धनाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला. हवामान बदल, वाढते प्रदूषण आणि घटणारे हरित क्षेत्र या गंभीर समस्यांच्या पार्श्वभूमीवर वृक्षसंवर्धन ही काळाची गरज असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित करण्यात आले. यानंतर शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. विशेष म्हणजे, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ५२ व्या वाढदिवसानिमित्त ५२ सावली देणाऱ्या वृक्षांचे संगोपन करण्याचा संकल्प शिवसेना शहरप्रमुख तुकाराम सरक आणि नगरसेविका सायली सरक यांनी केला. केवळ वृक्षारोपण करून थांबायचे नाही, तर लावलेल्या प्रत्येक रोपाचे संगोपन करून ते मोठे करण्याची जबाबदारी स्वीकारत पर्यावरण संवर्धनाचा आदर्श निर्माण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, “विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावतानाच पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणारे असे उपक्रम समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी आहेत. आजच्या पिढीमध्ये शिक्षणाबरोबरच पर्यावरणाबद्दलची जबाबदारी रुजविणे ही काळाची गरज आहे. अशा विधायक उपक्रमांमधून समाजात सकारात्मक परिवर्तन घडते.” या उपक्रमासाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी शिवसेना शहरप्रमुख तुकाराम सरक, नगरसेविका सायली सरक तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महापौर नितीन पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नगरसेवक रामदास शेवाळे, स्थायी समितीचे सभापती बबन मुकादम, सुधागड हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेंद्र पालवे, नगरसेवक राजेंद्र शर्मा, नगरसेविका सरस्वती काथारा, बायजा बारगजे, महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास भोईर, भाजपचे स्थानिक नेते अशोक मोटे, पुण्यवंत खटकाळे, डी. एन. मिश्रा, आबा लकडे, शंकर वीरकर, श्रीकांत फाळके, महेश गोडसे, निलेश दिसले, प्रेम डांगे, विभागप्रमुख संजय शेडगे, राज जाधव, प्रेम गोडसे, विराट पवार, सुभाष घाडगे, सुधीर ठोंबरे, कुमार नलावडे, यांच्यासह आयोजक तुकाराम सरक, नगरसेविका सायली सरक, विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाढदिवस साजरा करण्याची परंपरा केवळ औपचारिकतेपुरती न ठेवता ती समाजहिताशी जोडण्याचा हा प्रयत्न अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला. विद्यार्थ्यांच्या हातात ज्ञानाची शिदोरी देतानाच भूमीत हरित भविष्याची बीजे पेरण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. वृक्षांचे संगोपन आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन या दुहेरी उद्देशाने साजरा झालेला हा वाढदिवस सामाजिक उत्तरदायित्व आणि पर्यावरणप्रेमाचा आदर्श नमुना ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.




Be First to Comment