Press "Enter" to skip to content

पनवेल शहर पोलिसांची मोठी कारवाई

बनावट कागदपत्रांच्या आधारे २.२९ कोटींची जमीन फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

पनवेल (वार्ताहर) पनवेल शहर पोलिसांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन विक्री करून तब्बल २ कोटी २९ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून, या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११३/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करंजाडे येथील सर्व्हे क्रमांक ८१/२ मधील ४७ गुंठे जमीन मूळ मालक नाथन एलियाहू चिंचोलकर आणि शालोम (सलीम) एलियाहू चिंचोलकर यांच्या नावावर होती. दोघांचेही निधन झाल्यानंतर त्यांचे वारस इस्रायल आणि अमेरिकेत वास्तव्यास आहेत.

या परिस्थितीचा गैरफायदा घेत मुख्य आरोपी सूरज वासुदेव शिंदे याने आपल्या वडिलांना बनावट नाथन चिंचोलकर आणि पत्नीच्या भावाला बनावट शालोम चिंचोलकर बनवून त्यांच्या नावाने खोटी ओळखपत्रे तयार केली. त्यानंतर करंजाडे येथील जमीन पनवेल येथील फिर्यादी प्रशांत प्रभाकर पाटेकर आणि त्यांचा मुलगा श्रेयस पाटेकर यांना विकून त्यांच्याकडून २ कोटी २९ लाख ५० हजार रुपये उकळण्यात आले.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी सूरज शिंदे पत्नी, दोन मुली, वडील आणि अन्य नातेवाईकांसह विविध राज्यांत लपून राहत होता. तो महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड, राजस्थान, गुजरात आणि गोवा येथे सतत ठिकाणे बदलत होता. त्यामुळे त्याचा शोध घेणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरत होते.

पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पोवार आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक माहिती व गुप्त माहितीच्या आधारे गोव्यातील थिवी येथे सापळा रचून सूरज शिंदे (वय ३६), सतीश शिंदे (वय ४१) आणि तेजस सुवे (वय २६) यांना ताब्यात घेतले.

चौकशीत आणखी दोन आरोपी वासुदेव नामदेव शिंदे (वय ५६) आणि मनीष मोरे (वय ४४) यांचा सहभाग समोर आला. मनीष मोरे हा गोव्यातील अन्य एका गुन्ह्यात तुरुंगात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सर्व आरोपींना अटक करण्यात आली.

आरोपींच्या ताब्यातून मूळ जमीनमालक नाथन चिंचोलकर यांच्या नावाने बनविण्यात आलेले बनावट पॅनकार्ड आणि आधारकार्ड जप्त करण्यात आले आहेत. तसेच सूरज शिंदे आणि तेजस सुवे यांच्याविरोधात यापूर्वीही उरण पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता असून, पनवेल शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.