Press "Enter" to skip to content

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त जनआरोग्य शिबिर उत्साहात 

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन; आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती 

पनवेल (प्रतिनिधी)  भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवेचा वसा जपत पनवेलमध्ये जनआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज (दि. २७) डॉ. गुणे हॉस्पिटलजवळील भाजी मार्केट येथे पार पडलेल्या या शिबिराचे उद्घाटन प्रमुख मान्यवर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. तसेच या शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांची सदिच्छा भेट देत आयोजकांचे कौतुक केले.  या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून शेकडो नागरिकांनी आरोग्य सुविधांचा लाभ घेतला.

सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा सहज उपलब्ध व्हावी आणि विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाही नेत्रोपचाराचा लाभ मिळावा, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये आरोग्य तपासणी सोबत अनुभवी नेत्रतज्ज्ञांकडून मोफत नेत्र तपासणी, मोफत चष्म्यांचे वाटप, तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी तपासणी, नोंदणी व मार्गदर्शन करण्यात आले. 

व्हिजन फ्रेंड साकीब गोरे यांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या ‘देवाभाऊ चष्मा’ या विशेष उपक्रमांतर्गत “गरजू तिथे चष्मा आणि मोतीबिंदू निवारण” हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून नागरिकांना आवश्यक नेत्रसेवा उपलब्ध करून देण्यात आली. समाजकारण आणि लोकसेवा हीच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सार्वजनिक जीवनाची ओळख असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान, आरोग्य सेवा, सामाजिक उपक्रम, पर्यावरण संवर्धन अशा विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या जनआरोग्य शिबिराला नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला. यावेळी शिबिराच्या संयोजिका नगरसेविका दर्शना भोईर यांनी उपस्थित मान्यवर आणि शिबिरार्थींचे स्वागत करून शिबिराच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. यावेळी भाजपचे पनवेल शहर मंडल अध्यक्ष नगरसेवक सुमित झुंझारराव, माजी नगरसेवक जगदीश गायकर, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाईक, मधुकर उरणकर, सपना पाटील, कविता ठाकूर, कविता पाटील, जयश्री कामरेकर, नीता मंजुळे यांच्यासह पदाधिकारी, वैद्यकीय तज्ज्ञ, स्वयंसेवक, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजातील गरजू घटकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविणारा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून अशा समाजोपयोगी कार्यक्रमांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळत असल्याच्या भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.