
पनवेल, दि.25 (वार्ताहर) ः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि शिवसंकल्प प्रतिष्ठान, कळंबोली यांच्या वतीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त तसेच आषाढी एकादशीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून फराळ व तुळस वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सेक्टर-3, एलआयजी-1 येथील विठ्ठल मंदिर (के.एल.ई. महाविद्यालयाजवळ) येथे हा कार्यक्रम उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी उपस्थित भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले. तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत तुळशीच्या रोपांचे वितरण करण्यात आले.
या उपक्रमाचे आयोजन शिवसंकल्प प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुहास शिवाजी शिंदे आणि अध्यक्षा समीक्षा मनोज पंगम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हाप्रमुख दीपक निकम, महानगरप्रमुख समाधान काशीद यांच्यासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विविध पदाधिकारी, शिवसंकल्प प्रतिष्ठानचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा जागर करत समाजसेवा, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश दिला. कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


Be First to Comment