
पनवेल | प्रतिनिधी
मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था, पनवेल यांच्या वतीने आयोजित “मोगरा फुलला” हा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित भव्य भक्ती संगीत सोहळा आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री मा. ॲड. आशिषजी शेलार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी महाराष्ट्राच्या संत परंपरेचे जतन, अभंग परंपरेचा प्रचार आणि सांस्कृतिक मूल्यांचा प्रसार करणाऱ्या अशा उपक्रमांचे कौतुक करत आयोजक संस्थेचे अभिनंदन केले.
या प्रसंगी मा. खासदार श्री. रामशेठ ठाकूर, मा. नगराध्यक्ष श्री. जे. एम. म्हात्रे, मा. सभापती (म्हाडा) श्री. बाळासाहेब पाटील, आमदार श्री. विक्रांतजी पाटील, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेशजी वाकडीकर, पनवेल पंचायत समिती सभापती सौ.रंजनाताई वास्कर , खालापूर पंचायत समिती सभापती श्री. कृष्णाशेठ पारंगे ,भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. अविनाशजी कोळी, पनवेल महानगरपालिकेचे महापौर श्री. नितीनजी पाटील, तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, सहकारी नगरसेवक, कार्यकर्ते आणि असंख्य नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमात श्री. गणेश शिंदे यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनकार्यावर प्रभावी निरूपण केले, तर सौ. सन्मिता धापटे-शिंदे यांनी अभंग व भक्तिगीतांच्या सुरेल सादरीकरणातून संपूर्ण सभागृह भक्तिरसात तल्लीन केले. कार्यक्रमाला विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, वारकरी भाविक आणि युवक-युवतींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली. उपस्थितांनी टाळ्या आणि हरिनामाच्या गजरात कलाकारांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सामाजिक बांधिलकी जपत संस्थेच्या वतीने पनवेल परिसरातील विविध वृद्धाश्रमांतील ज्येष्ठ नागरिकांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते, जेणेकरून त्यांनाही या भक्तिमय सोहळ्याचा आनंद घेता यावा. तसेच बालग्राम अनाथाश्रमातील लहान मुलांनाही आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विशेष निमंत्रित म्हणून सहभागी करून घेण्यात आले. संत साहित्य, अभंग आणि अध्यात्माची गोडी बालपणापासून निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
पनवेल महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. ममता प्रितम म्हात्रे यांनी या सामाजिक उपक्रमासाठी विशेष पुढाकार घेत वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक आणि बालग्राममधील चिमुकल्यांच्या सहभागाचे नियोजन केले. समाजातील वंचित घटकांनाही सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंदाचा लाभ मिळावा, या भावनेतून त्यांनी केलेल्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले.
यावेळी जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष तथा भाजप नेते श्री. प्रितम जनार्दन म्हात्रे म्हणाले,
“मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यामागील उद्देश केवळ सांस्कृतिक सोहळा साजरा करणे हा नव्हता, तर समाजातील प्रत्येक घटकापर्यंत संत ज्ञानेश्वर महाराजांचे विचार, भक्ती आणि संस्कार पोहोचविणे हा होता. वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक आणि बालग्राममधील चिमुकल्यांना या कार्यक्रमात सहभागी करून घेणे ही आमची सामाजिक बांधिलकी आहे. जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून समाजहिताचे, संस्कारक्षम आणि जनकल्याणाचे उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्यात येतील.”
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था, पनवेल यांच्या वतीने करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्याचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे भारतीय संस्कृती, संत परंपरा, सामाजिक समरसता आणि आध्यात्मिक मूल्ये अधिक दृढ होत असल्याचे मत व्यक्त केले. भक्ती, संस्कृती आणि समाजसेवेचा सुंदर संगम घडवून आणणारा हा सोहळा पनवेलकरांच्या स्मरणात कायम राहील, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.



Be First to Comment