
नागोठणे : याकूब सय्यद
नागोठणे वन विभागाने गुप्त माहितीच्या आधारे पाली-वाकण मार्गावर धाडसी कारवाई करत अवैध खैर लाकडांची वाहतूक करणारी कार जप्त केली. या कारवाईत १८ ते १९ नग खैर लाकडे, पेट्रोल कटर मशीन आणि कारसह एकूण ३९,२३६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अवैध खैर तस्करी करणारे तिघांना अटक करण्यात आली आहे.
नागोठणे वन परिक्षेत्र अधिकारी दादासाहेब कुकडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे उपवनसंरक्षक उमेश वावरे व सहायक वनसंरक्षक भाऊसाहेब जावरे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या पथकाने बुधवार दिनांक २२ जुलै सकाळी तीनच्या सुमारास पाली-वाकण रस्त्यावरील वजरोली येथे सापळा रचून तालुका सुधागड पाली गावाच्या दिशेने येणारी मारुती अल्टो (एमएच-०६ एएन-२०८३) कार थांबवून तीची झाडाझडती केली असता, त्यामध्ये ०.३४५ घनमीटर क्षमतेचे १८ ते १९ नग खैर लाकडाचे तुकडे निदर्शनास आले.
अवैद्य खैर लाकडाची तस्करी करणारे कार या वाहनातील तिघांकडे खैर लाकडाच्या वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वन विभागाने अंदाजे ३० ते ३५ हजार रुपये किमतीची कार, तसेच ४,२३६ रुपये किमती खैर लाकूड आणि ५ हजार रुपये किमतीचे पेट्रोल कटर मशीन असा एकूण ३९,२३६ रुपयांचा मुख्यमाल जप्त केला.
या प्रकरणी भाऊ चंदर मोरे वय वर्ष (३२), आकाश बाबाजी वाघमारे वय वर्ष (२३) आणि महेंद्र मनोहर वाघमारे वय वर्ष (२६, सर्व राहणारे चांदे आदिवासीवाडी, ता. माणगाव, जि. रायगड) तस्करांना अटक करण्यात आले संबंधित कारवाईत वनरक्षक अर्जुन जारवाल, मधुकर सोनवणे, अमोल खांडेकर, रणजीत कारंडे, प्रवीण देवडे आणि व्यंकटी माने यांनी महत्वाची भूमिका बजावली असून या प्रकरणी भारतीय वन अधिनियम, १९२७ मधील विविध कलमात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिक्षेत्र वन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल मनोज साळवी हे पुढील तपास करीत आहेत.


Be First to Comment